महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींचं दोन शब्दात उत्तर

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींनी मौन सोडलं

Updated: Nov 20, 2019, 04:04 PM IST
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींचं दोन शब्दात उत्तर title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून सत्तास्थापनेसाठी हालचाली करत आहेत. पण याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना विचारलं असताना त्यांनी 'नो कमेण्ट्स' अशी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी संसद भवनामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सोनिया गांधींनी हे उत्तर दिलं. पीटीआयने याबाबतची बातमी दिली आहे.

पुढच्या महिन्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन होईल, तसंच पुढच्या २ दिवसात चित्र स्पष्ट होईल, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सोनिया गांधींची अशी प्रतिक्रिया आली आहे.

एकीकडे सोनिया गांधींनी ही प्रतिक्रिया दिली असतानाच दिल्लीत आज संध्याकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला, मंत्रीमंडळातील खातेवाटप, महामंडळाचे वाटप,किमान समान कार्यक्रम, विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांचं वाटप कसं असावं याबाबत तयारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबत शिसेनेशी चर्चा केली जाईल. शिवसेनेबरोबर अंतिम चर्चा करण्याआधी दोन्ही पक्षात एकवाक्यता नर्माण करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केल्याचं समजतंय. मात्र या बैठकीला शरद पवार हजर राहणार नाहीत. 

राज्यपालांनी सत्तास्थापनेचं आमंत्रण दिल्यानंतरही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. यानंतर १२ नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. महाराष्ट्रामध्ये भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. निवडणुकीआधी भाजप शिवसेनेची युती झाली असली, तरी शिवसेनेनं केलेली अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी भाजपने फेटाळली, त्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापन करता आली नाही.