मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञाचा भाजपमध्ये प्रवेश; भोपाळमधून रिंगणात

भोपाळ मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपला उमेदवार मिळत नव्हता.

Updated: Apr 17, 2019, 05:32 PM IST
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञाचा भाजपमध्ये प्रवेश; भोपाळमधून रिंगणात title=

नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून शिवराज सिंह चौहान, रामलाल आणि प्रभात झा हे भाजपचे बडे नेते साध्वी प्रज्ञा हिच्या संपर्कात होते. अखेर त्यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर साध्वी प्रज्ञा यांनी भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार साध्वी प्रज्ञा यांना भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

भाजप प्रवेशानंतर साध्वी प्रज्ञा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनही, असे तिने सांगितले. 

भोपाळ मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपला उमेदवार मिळत नव्हता. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि उमा भारती यांनी भोपाळमधून लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा यांना रिंगणात उतरवण्याचा भाजपचा विचार आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. 

याबाबत अजून भाजपने अधिकृतरित्या कोणताही भूमिका मांडली नसली तरी भाजपच्या नेत्यांकडून तसे संकेत मिळत आहेत. साध्वी यांच्या भाजप प्रवेशानंतर दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी सूचक ट्विट केले. भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर विरुद्ध दिग्विजय सिंह?, असा संदेश या ट्विटमध्ये होता. भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. भोपाळ मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आलोक सांजर यांना ७.१४ लाख मते मिळाली होती. 

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते.