भाजपचा नेताच म्हणतो ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

२०१९ निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.

Updated: Jan 6, 2019, 04:08 PM IST
भाजपचा नेताच म्हणतो ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत title=

कोलकाता : २०१९ निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आगामी काळात पंतप्रधान कोण होणार यावरून देशातल्या नेत्यांकडून वेगवेगळी नावं पुढे करण्यात येत आहेत. ज्याचा त्याचा पंतप्रधान असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. प्रत्येक पक्ष स्वत:च्या नेत्याचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे करत आहे. असं असतानाच आता भाजपच्या नेत्यानं पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मोदींचं नाव घेण्याऐवजी चक्क ममता बॅनर्जीचं नाव घेतलं आहे. पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी मोठं विधान केलंय. पश्चिम बंगालमधून पंतप्रधान बनण्याची क्षमता कुणात असेल तर ती फक्त ममता बॅनर्जी यांच्यातच आहे, असं विधान घोष यांनी केलंय.

बंगाली व्यक्तींपैकी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुणाचे नाव असेल तर ते ममता यांचेच असेल असंही घोष म्हणालेत. घोष यांनी ज्योती बसू यांचं नावही घेतलं. मात्र, पक्षामुळे ज्योती बसू पंतप्रधान बनू शकले नाहीत असं ते म्हणाले.

याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०५० वर्षाआधी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी असेल असं विधान केलं होतं. मराठी माणसामध्ये पंतप्रधानपद भूषणवण्याची क्षमता असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

दुसरीकडे, जेडीयुनेही पंतप्रधानपदाचे नाव जाहीर करण्याच्या शर्यतीत उडी घेतलीय. बिहारमधून नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे जेडीयू प्रवक्ता राजीव रंजन यांनी म्हटलंय. मात्र, बिहारमधील भाजपा नेते सीपी ठाकूर यांनी जेडीयुचा हा दावा फेटाळला. बिहारमधून पंतप्रधानपदाचा कुणीही चेहरा नसून केवळ मोदी हेच पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.