नवी दिल्ली : सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. लग्नसराईत सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं मात्र, बदायूमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
लग्नात नवरदेवाचे बूट लपविण्याची परंपरा जवळपास सर्वत्र असते. त्यानंतर हे बूट मिळवण्यासाठी नवरदेवाला आणि त्याच्या नातेवाईकांना एक प्रकारची कसरतचं करावी लागते.
लग्नात आनंदाने आणि मजा-मस्ती करत बूट लपवण्याची परंपरा पार पाडली जाते. मात्र, बूट लपवणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
उत्तर प्रदेशामधील बदायू जिल्ह्यातील बिल्सी परिसरात एक लग्न सोहळा सुरु होता. लग्नात बूट चोरण्याच्या संशयावरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी एका व्यक्तीला जबर मारहाण केली. यानंतर पीडित व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृतक ४२ वर्षीय रामसरनच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या चार मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्सी येथे राहणाऱ्या सुरेंद्रचं सूरजपुर गावात राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी सुरेंद्र सूरजपुर गावात दाखल झाला. लग्न सोहळ्याच्या विधी करण्यासाठी नवरदेव आपले शूज काढून ठेवले होते. मात्र, ज्यावेळी तो पुन्हा परत आला त्यावेळी शूज तेथे नव्हते. त्यानंतर सुरेंद्रच्या मित्रांनी रामसरन याच्यावर बूट चोरी केल्याचा आरोप केला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या बेदम मारहाणीत रामसरन गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले मात्र, त्याचा मृत्यू झाला.