गुडगाव : आपल्या पत्नीला 'आयफोन ७' गिफ्ट देण्याची इच्छा असलेल्या एका पतीला ऑनलाईन शॉपिंग थोडी महागात पडलीय.
राजीव जुल्का असं या व्यक्तीचं नाव आहे. २४ नोव्हेंबर रोजी आपल्या पत्नीला गिफ्ट देण्यासाठी राजीव यांनी 'अमेझॉन'वरून ऑनलाईन आयफोन-७ फोनचं बुकींग केलं होतं. फोनचं ४४ हजार ९०० रुपयांचं अॅडव्हान्स पेमेंट त्यांनी त्यावेळीच केलं होतं. त्यानंतर, दोन दिवसांनी आशिष नावाच्या एका डिलिव्हरी बॉय पार्सल हॅन्डओव्हर करण्यासाठी त्यांच्या घरी आला. पार्सल उघडल्यानंतर राजीव यांना चांगलाच धक्का बसला.
पार्सलच्या पाकिटात फोनचा चार्जर, इअर फोन, फोन कव्हर असं सगळं सामान होतं... परंतु, फोनऐवजी डब्यात रिन साबण पाहून राजीव यांना काही सुचेनाच... त्यांनी ताबडतोब गार्डच्या मदतीनं गेटवर पोहचलेल्या डिलीव्हरी बॉयला पकडलं.
यानंतर या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली. परंतु, कंपनीला ही घटना समजल्यानंतर त्यांनी ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये संपूर्ण रक्कम परत टाकली. त्यानंतर राजीव यांनी आपली तक्रार परत घेतली.