माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काही काळ राज्यसभेच्या बाहेर राहावं लागणार?

आसाममधून पुन्हा निवडून येणं अवघड

Updated: May 16, 2019, 12:50 PM IST
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काही काळ राज्यसभेच्या बाहेर राहावं लागणार?

नवी दिल्‍ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काही काळासाठी राज्यसभेच्या बाहेर राहावं लागू शकतं. कारण राज्यसभेच्या सदस्याच्या कार्यकाळ जूनमध्ये संपत आहे. मनमोहन सिंग ५ वेळा राज्यसभेचे सदस्य होते. १४ जूनला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. ७ जूनला येथे निवडणूक होणार आहे. आसाममधून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. आसाममधील २ पैकी एक जागेवर काँग्रेसचेच एस कुजूर खासदार आहेत. तर दुसऱ्या जागेवर मनमोहन सिंग खासदार आहेत.

आसाममध्ये आता भाजप सत्तेत आहे. त्यामुळे काँग्रेसकडे इतकं संख्याबळ नाही की ते पुन्हा मनमोहन सिंग यांना निवडून आणू शकतील. भाजप या जागेवर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना संधी देऊ शकते. कारण आता ते लोकसभा निवडणूक नाही लढवत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, जर काँग्रेस मनमोहन सिंग यांना पुन्हा संधी देण्याचा विचार करत असेल तर त्यांना राज्यसभेचे सदस्य असलेल्या जे नेते लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विजयानंतर त्यांच्या जागेवर मनमोहन सिंग यांना संधी दिली जाऊ शकते. जुलैमध्ये तमिळनाडूतील राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होणार आहेत. द्रमुक येथून मनमोहन सिंग यांना एक जागा देऊ शकते. अन्यथा एप्रिल २०२० पर्यंत मनमोहन सिंग यांना वाट पाहावी लागणार आहे. २०२० मध्ये विविध राज्यातील ५५ जागा रिक्त होणार आहेत. त्यापैकी काही जागा काँग्रेसला मिळू शकतात.