नवी दिल्ली : वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग (९८) यांचे दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग यांची प्रकृती चिंताजनक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धानोआ यांनी आज दुपारी रुग्णालयात जाऊन मार्शल अर्जन सिंह यांची विचारपूस केली होती.
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या व्यतिरिक्त अर्जन सिंह यांनाच मार्शल हा मान देण्यात आला होता. ते वायुदलाचे फाईव्ह स्टार अधिकारी होते. मार्शल अर्जन सिंह वायुदल प्रमुख या पदावरुन १९६९ मध्ये निवृत्त झाले. निवृत्त होईपर्यंत त्यांनी वायुदलातील ६० प्रकारच्या विमानांमधून उड्डाण केले होते.
एक वैमानिक म्हणून ६० प्रकारची विमानं हाताळणारे अर्जन सिंह हे देशातले एकमेव वायुदल अधिकारी. त्यांच्या सन्मानार्थ वायुदलाने २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील पनगड विमानतळाला ‘एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंह’असे नाव दिले. वायुदल अधिकाऱ्याचे नाव एखाद्या विमानतळाला देण्याची ही देशातली एकमेव घटना आहे.
आधी वायुदल प्रमुखाला एअर मार्शल म्हणत मात्र १९६५ मधील अर्जन सिंह यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना एअर चीफ मार्शल अशी बढती देण्यात आली. ते ४४व्या वर्षी वायुदल प्रमुख झाले. त्यांनी १ ऑगस्ट १९६४ ते १५ जुलै १९६९ पर्यंत वायुदल प्रमुख म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली.
अर्जन सिंह यांनी ५० वर्षाचे असतानाच निवृत्ती स्वीकारली. त्याआधी ६५च्या युद्धात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. या कामगिरीसाठी त्यांना १९६५ मध्येच पद्म विभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निवृत्तीनंतर १९७१ मध्ये ते स्विर्त्झलंड येथे भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. तर काहीकाळ व्हॅटिकन सिटी येथे त्यांनी भारताचे राजदूत म्हणून काम केले होते.