रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट

रुग्णालयाच्या ऑफरमुळे आरोग्य विभाग चिंतेत सापडलं आहे. 

Updated: Jul 6, 2020, 09:55 AM IST
रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट title=

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात उत्तर प्रदेशातील एका खासगी रुग्णालयाने २५०० रुपयात कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्याची ऑफर सुरू केली आहे. रुग्णालयाच्या या ऑफरमुळे आरोग्य विभाग चिंतेत सापडलं आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या धक्कादायक बातमीनंतर मेरठमध्ये एकच खळबळ माजाली आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाकडून सांगितले जात आहे की, 'फक्त २ हजार ५०० रूपयांमध्ये कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल. रिपोर्टमध्ये सरकारी रुग्णालयाता शिक्का असेल. शिवाय हा रिपोर्ट १४ दिवसांसाठी वैध असणार आहे.' या रिपोर्टवर प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचा शिक्का आहे.

प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक पी के बन्सल यांनी याप्रकरणी कोणतीही माहिती रुग्णालयाकडे नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संबंधित रुग्णालय प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल करण्यता आला आहे. त्याबरोबर रुग्णालय बंद देखील करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या या धक्कादायक ऑफरनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

याप्रकरणी मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. शाह आलम यांच्या नावावर हे रुग्णालय आहे. आलम यांनी रुग्णालयावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. आपली आणि रुग्णालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. असं ते म्हणाले. 

मेरठमध्ये १११६ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यपैकी २७५ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ७७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.