बिहार : नवऱ्याचं आपल्या पत्नीवर किती प्रेम असावं याला काही सीमाच नाही. कारण नवऱ्यानं जे केलं त्यासाठी तिला ऋणीही राहाणं शक्य होईल की नाही सांगता येत नाही. आतापर्यंत त्याग हा काय असतो अनेक सिनेमा आणि सीरियलमधून पाहिला असेल मात्र तोच प्रत्यक्षात एक व्यक्तीनं आपल्या पत्नीसाठी केला आहे.
आपल्या पत्नीचा जीव दुसऱ्यावर जडल्याचं कळताच त्याने पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंण्डसोबत लग्न लावून दिलं. ही कहाणी हम दिल दे चुके सनमशी अगदी परफेक्ट जुळणारी आहे. या व्यक्तीनं आपल्या पत्नीचं लग्न सर्वांसमक्ष ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याच्याशी लावून दिलं. ही घटना एक आठवड्यापूर्वीची आहे. मात्र त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडीओवरून हे लग्न बंगळुरू इथे करण्यात आलं. तर ही घटना बिहारच्या जमुई भागातली आहे. पती विकास कुमार याने आपल्या पत्नीचं लग्न स्वखुशीनं तिच्या बॉयफ्रेंडशी लावून दिलं आहे. विकास कुमार बंगळुरू इथे नोकरी करतात. त्यांचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं.
विकास कुमार यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली होती. विकास यांना आपल्या बायकोच्या सामानात एक तरुणाचा फोटो सापडला. त्यांनी या फोटोबाबत आपल्या पत्नीकडे चौकशी केली. हा फोटो तिच्या बॉयफ्रेंडचा असल्याचं विकास कुमार यांना समजलं.
या तरुणाचं नाव सचिन असं होतं. कामानिमित्ताने सचिन बंगळुरू इथे आला होता. सचिनला आपल्या गर्लफ्रेंडबद्दल यावेळी माहिती मिळाली. त्याने बंगळुरूमध्ये नोकरी मिळवली आणि तो शिवानीला म्हणजे विकासच्या पत्नीला भेटायला लागला.
याच दरम्यान या प्रेमकहाणीमध्ये मोठा आणि अनपेक्षित ट्वीस्ट आला. विकास यांनी आपल्या पत्नीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोणत्याही परिस्थितीमध्ये समजून घेण्यास तयार नव्हती. तिने सचिनला भेटण्याचा जणू निश्चयच केला होता.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून शिवानी आणि सचिनचं स्वत: लग्न लावून देण्याचा निर्णय विकास यांनी घेतला. याचा व्हिडीओ त्याने स्वत: तयार करून सोशल मीडियावर शेअर केला.