नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना नव्याने जारी झाल्या आहेत. कोविड- १९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने घरोघरी जाऊन पाहणी करणे, कोविड चाचणीची सक्षम यंत्रणा विकसित करणे आणि अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. तसेच घरोघरी जावून पाहणीही करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहेत, अशा ठिकाणी प्रत्येक घरात जावून आरोग्य तपासणी करणावी, या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सोमवारी कोविड- १९ चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या निवडक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. त्यावेळी या सूचना देण्यात आल्या आहेत. अनलॉक-१ सुरु करताना राज्यांनी पुढील काही महिने जिल्हावार नियोजन करावे, असे त्या म्हणाल्या.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनानं कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असणारे, वृद्ध नागरिक, अन्य आजार असणारे यांच्याकडे अधिक लक्ष पुरवणं, कोरोना पॉसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा तपास आणि नागरिकांमध्ये आरोग्य-पूरक वर्तणुकीला प्रोत्साहन या उपायांची अंमलबजावणी करावी अशी सूचना त्यांनी केली.
महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या दहा राज्यांमधल्या एकूण ४५ महापालिका क्षेत्रांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने करायच्या उपाययोजनांबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह अन्य आजार असलेल्या रुग्णांना देखील प्रशासनानं सेवा पुरवणं आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.