आमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे.  विधानसभा अध्यक्षांना  वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे.   

रामराजे शिंदे | Updated: Oct 17, 2023, 06:11 PM IST
आमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी title=

Maharashtra Politics : आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात आता 30 ऑक्टोबरला पुढील सुनावणी केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांना सुनावणीवर सुधारित वेळापत्रक देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले होते. विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेवर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे आणि शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) केली आहे. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुधारित वेळापत्रक द्या अन्यथा आम्ही आदेश देऊ अशा शब्दात कोर्टानं नार्वेकरांना सुनावलं होतं. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आता याप्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 30 ऑक्टोबरला होणार आहे. 

दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आता चांगलीच जुंपलीय. आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर टाईमपास सीरिज बनवत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.  यावर आता राहुल नार्वेकरांनी पलटवार केलाय. संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही अशी टीका नार्वेकरांनी केलीय. तर राऊतांचं वेळापत्रक ठरलं असून त्यांची दिवाळी जेलमध्ये जाईल असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय

कोर्टात आज काय झालं.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली आणि पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कोर्टानं चांगलंच फटकारलं. विशेषत: नार्वेकरांवर ठाकरे गटाकडून होत असणारा वेळकाढूपणाचा आरोप आणि सुनावणीच्या वेळापत्रकावरुन सुप्रीम कोर्टानं खडे बोल सुनावत अल्टिमेटमच दिला..सुप्रीम कोर्टानं काय ताशेरे ओढले पाहुयात.. 

विधानसभा अध्यक्षांवर पुन्हा कोर्टाचे ताशेरे
विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक देण्याची 30 ऑक्टोबर शेवटची संधी, आम्ही वेळापत्रकावर समाधानी नाही असं कोर्टाने म्हटलंय. आज सुधारित वेळापत्रक मिळेल अशी अपेक्षा होती, 11 मे नंतर अध्यक्षांनी काहीच केलं नाही, अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल तसंच विधानसभाअध्यक्षांनी प्रकरण निकाली काढावं असं कोर्टाने म्हटलंय.

ठाकरे गट (Thackeray Group) आणि शरद पवार गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर विधानसभा अध्यक्षांची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी मांडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी वेळापत्रकावरुन सलग दुसऱ्यांदा नार्वेकरांना सुनावलंय. सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर ताशेरे ओढले. मात्र सुप्रीम कोर्ट जर निकाल देण्यासाठी अनेक महिन्यांचा अवधी घेऊ शकतं तर विधानसभा अध्यक्ष का घेऊ शकत नाहीत अशी चर्चा विधानसभा अध्यक्षांच्या गोटात सुरु असल्याचीही चर्चा आहे.