जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. 

Updated: Nov 12, 2021, 02:49 PM IST
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार जम्मू-काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. हे दहशतवादी सुरक्षा दलाच्या रडारवर आहेत. हे दहशतवादी सुरक्षा दलांना चकमा देऊन ओजीडब्ल्यू (ओव्हर ग्राउंड वर्कर) च्या मदतीने इकडे-तिकडे लपून बसले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच भरती झालेल्या दहशतवाद्यांचा वापर जुने दहशतवादी करत आहेत.

खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी गुप्तचर यंत्रणांनी तयार केली आहे. तयार करण्यात आलेल्या 38 दहशतवाद्यांच्या यादीत 27 लष्कराचे दहशतवादी आणि उर्वरित 11 जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. यापैकी 4 दहशतवादी श्रीनगर, 3 कुलगाम, 10 पुलवामा, 10 बारामुल्ला आणि 11 दहशतवादी वेगवेगळ्या भागात लपून बसल्याची शक्यता आहे.

खोऱ्यात उपस्थित असलेले पाकिस्तानी दहशतवादी नव्याने भरती झालेल्या संकरित दहशतवाद्यांचा वापर सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी, हत्या आणि सुरक्षा रक्षकांवर ग्रेनेड हल्ले करण्यासाठी करत आहेत. म्हणजेच ‘छोटे दहशतवादी आणि मोठे षड्यंत्र’ ही योजना पाक प्रवृत्तीच्या दहशतवाद्यांकडून रचली जात आहे.

एनआयए, जम्मू-काश्मीर पोलीस आणि आयबीची टीम काश्मीरमध्ये सतत कारवाई करण्यात गुंतलेली आहे. एनआयएने आतापर्यंत 30 हून अधिक दहशतवादी आणि एलईटी, जैश, एचएम, अल्बदर आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी संघटना टीआरएफच्या साथीदारांना अटक केली आहे.

5 अतिरिक्त कंपन्या पाठवण्याचा निर्णय

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने होत असलेल्या नागरिकांच्या हत्या पाहता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. वास्तविक, गृह मंत्रालयाने CRPFच्या 5 अतिरिक्त कंपन्या जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच राज्यात नागरिकांच्या हत्या होत असल्याने सुरक्षा दलाच्या एकूण 55 कंपन्या म्हणजेच सुमारे 5500 जवान अतिरिक्त घाटीत तैनात करण्यात येणार आहेत.
 
सूत्रांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफच्या 25 कंपन्या आणि सीआरपीएफच्या 25 कंपन्या आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वर्षानंतर बीएसएफच्या 25 कंपन्या अंतर्गत सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून खोऱ्यात 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात काही बिगर काश्मिरी तरुणांचाही समावेश आहे. अलीकडे पिस्तुलाने टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीनगरमध्ये दररोज 15000 लोक आणि 8000 वाहनांची तपासणी केली जात आहे. यासोबतच या परिसरात इलेक्ट्रॉनिक टेहळणी वाढवण्यात आली असून, यामध्ये सीसीटीव्ही, ड्रोनसह सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.