Pakistan Economic Crisis: संकटात अडकलेल्या पाकिस्तानला भारताकडून आर्थिक मदत? मोदी सरकार म्हणते...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक संकट हे सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच भारताने शेजारच्या देशाला मदत करणार की नाही यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Updated: Feb 22, 2023, 06:03 PM IST
Pakistan Economic Crisis: संकटात अडकलेल्या पाकिस्तानला भारताकडून आर्थिक मदत? मोदी सरकार म्हणते... title=
India vs Pakistan

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक संकट हे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. दिवसोंदिवस हे संकट अधिक गंभीर होत असून जवळजवळ संपूर्ण देशामध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. आयएमएफ, जागतिक बँकेसहीत अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार दिला आहे. वेळेत पाकिस्तानला आर्थिक मदत मिळाली नाही तर देशातील परिस्थिती अधिक चिंताजनक होणार हे निश्चित मानलं जात आहे. आता अशा परिस्थितीमध्ये भारत या शेजारच्या देशाला मदत करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारताकडून मदतीची चर्चा

पाकिस्तानलाही भारताकडून मदतीची अपेक्षा आहे अशी चर्चा पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे. भारतही खरोखरच श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानलाही आर्थिक मदत करणार का? यासंदर्भात भारत सरकारच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआयशी चर्चा करताना जयशंकर यांनी पाकिस्तान आर्थिक संकटात असतानाच शेजारचा देश म्हणून भारताची भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंकेची तुलना

पाकिस्तानचं भविष्य हे त्यांची कामं आणि उपलब्ध पर्यायांवर अवलंबून आहे, असं एस. जयशंकर म्हणाले. शेजारच्या देशावर ओढवालेल्या आर्थिक संकटामधून स्वत:च वाट शोधावी लागणार आहे, असंही जयशंकर म्हणाले. भारत श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानलाही मदत करणार का? असा प्रश्न जयशंकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे, "श्रीलंका आणि पाकिस्तानबरोबर भारताचे संबंध हे फारच वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत," असं उत्तर दिलं. 

भारत कायमच श्रीलंकेच्या पाठीशी

सन 2022 मध्ये श्रीलंकेतील आर्थिक स्थिती फारच चिंताजनक होती. श्रीलंकेत दैनंदिन वस्तूंचाही तुटवडा निर्माण होण्यापर्यंत परिस्थिती खालावली होती. जेव्हा जगातील सर्व देशांनी आणि आर्थिक संस्थांनी श्रीलंकेकडे पाठ फिरवली होती. तेव्हा भारताने श्रीलंकेला तब्बल 4.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत केली होती. मागील महिन्यामध्ये भारताने अंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनला श्रीलंकेला आवश्यक ते कर्ज द्यावं यासंदर्भातील समर्थन पत्र पाठवलं आहे. भारताने अशाप्रकारे पहिल्यांदाच श्रीलंकेची मदत केलेली नाही. यापूर्वी भारताने एलटीटी आणि प्रभाकरण यांचा खात्मा करण्यासाठी या देशाला मदत केली होती.

पाकिस्तानबद्दल देशात...

जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, जर मी त्यांची (पाकिस्तानची) तुलना श्रीलंकेशी केली तर दोन्ही देशांबरोबर आपले संबंध फारच वेगळे आहेत. श्रीलंकेबरोबर आजही भारतीयांना आपुलकी वाटते. स्वाभाविकपणे आम्हाला शेजारच्या देशांबद्दल चिंता आहे. मात्र त्याचवेळी या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची मदत केली पाहिजे अशीही एक भावना असते, असं परराष्ट्रमंत्री म्हणाले.
भारताच्या शेजारी असलेल्या इतर देशांमध्ये काही संकट आल्यास आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही, असं जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. इतर देशांना मदतीसाठी तयार असल्याचं सांगतानाच, "देशात पाकिस्तानबद्दल काय भावना आहेत. किंवा पाकिस्तानला आपल्या देशाबद्दल काय वाटतं याबद्दलचा विचार करणंही आवश्यक आहे," असंही जयशंकर यांनी अधोरेखित केलं.