छेडछाडीची तक्रार करायला गेलेल्या 'त्या' मुलीशी पोलिसांची गैरवर्तणूक; प्रियंका गांधींची आगपाखड

पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी मुलीलाच फैलावर घेतले. 

Updated: Jul 25, 2019, 05:47 PM IST
छेडछाडीची तक्रार करायला गेलेल्या 'त्या' मुलीशी पोलिसांची गैरवर्तणूक; प्रियंका गांधींची आगपाखड title=

लखनऊ: उत्तर प्रदेशात छेडछाडीची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या मुलीशी पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यासंदर्भातील व्हीडिओ ट्विट केला असून पोलिसांवर आगपाखड केली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, मुलांच्या एका टोळक्याने या मुलीची छेड काढली होती. मुलीच्या भावाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने त्यालाही मारहाण केली. यानंतर संबंधित मुलगी तक्रार करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात गेली. मात्र, याठिकाणी पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी मुलीलाच फैलावर घेतले. 

यावेळी पोलीस अधिकाऱ्याने मुलीच्या वेशभुषेविषयी टिप्पणी केली. तू हातात अंगठ्या, बांगड्या आणि लॉकेट का घातले आहेस? यावरूनच तू काय आहेत, ते समजते, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले. 

हा व्हीडिओ समोर आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील यंत्रणेवर चांगलीच आगपाखड केली. छेडछाडीची तक्रार करायला गेलेल्या मुलीला पोलीस ठाण्यात अशी वागणूक दिली जाते. एकीकडे उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी कमी व्हायचे नाव नाही. तर दुसरीकडे कायद्याचे रक्षण करणारे अधिकारीच अशाप्रकारे वागत आहेत. 

महिलांचे म्हणणे ऐकून घेणे, हीच त्यांना न्याय मिळण्याची पहिली पायरी असल्याकडे यावेळी प्रियंका यांनी लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वीच सोनभद्र येथील उम्भा या गावात भूमाफियांनी नऊ आदिवासी व्यक्तींची हत्या केली होती. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली होती.