Money Management Tips: शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरमसाठ पैसा कमवण्यासाठी गुंतवणूकदारांची क्रेझ खूप वाढली आहे. सध्या बऱ्याच जणांना शेअर बाजारातून कमाई करायची आहे. असं असलं तरी, यामध्येही मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात मर्यादित गुंतवणूक करणं आणि पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करताना, अॅसेट अलोकेशनसाठी '100 minus age' हा नियम लक्षात ठेवणं फायदेशीर ठरु शकतं. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ संतुलित राहतो. या नियमानुसार, जेवढ तुमचं वय असेल त्याप्रमाणात अॅसेट अलोकेशन करायला हवं.
जर तुम्ही तरुण असाल तर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकता आणि इक्विटीमध्ये अधिक गुंतवणूक करू शकता. वयानुसार जोखीम घेण्याची क्षमता कमी होत जात असते. उदा. तुमचं वय 25 वर्षे असेल आणि तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल, तर '100 minus age' नुसार 75 टक्के (100-25=75) इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शकता. 25% कर्जामध्ये गुंतवायला हवेत. त्याचबरोबर, जेव्हा एखादी व्यक्ती 40 वर्षांची असेल आणि तो गुंतवणूक करण्यास सुरुवात करतो, तेव्हा त्याने जोखमीवर अवलंबून जास्तीत जास्त 60 टक्के (100-40 = 60) इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी. 40 टक्के डेट फंडात गुंतवणूक करावी.
गुंतवणुकीचा हा नियम प्रत्येकालाच लागू होईल असं नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराची आर्थिक परिस्थिती, जोखीम घेण्याची क्षमता आणि खर्च वेगवेगळे असतात. प्रत्येक गुंतवणूकदाराचे गुंतवणुकीचे उद्दिष्टही वेगळं असतं. या सर्व घटकांचा तुमच्या अॅसेट अलोकेशनवर परिणाम होत असतो. जेव्हा गुंतवणुकीची जबाबदारी जास्त असते तेव्हा तिची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल तर तुमची जोखीम घेण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर, हा नियम तुमच्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन राखण्यास मदत करतो.
गुंतवणुकीत किती जोखीम असावी, हे पूर्णपणे ध्येय आणि वेळेवर अवलंबून असतं. शेअर बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता आणि अनिश्चितता आहे. म्हणून, अल्प किंवा मध्यम मुदतीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास योग्य परतावा किंवा तोटा होण्याची शक्यता असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सध्याच्या डाउनट्रेंडमध्ये खरेदी केली आणि दीर्घ काळासाठी म्हणजे किमान 3-5 वर्षे गुंतवणूक केली तर त्याला मोठा परतावा मिळू शकतो.
पैशांच्या व्यवस्थापनाबाबत आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे, 50:30:20 चा नियम. आनंद राठी वेल्थ लिमिटेडचेडेप्युटी सीईओ आनंद राठी (Anand Rathi, CEO of Anand Rathi Wealth Limited) यांच्या मते, या नियमानुसार तुमच्या कमाईतील जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम गरजेनुसार खर्च केली पाहिजे. यामध्ये तुमच्या घराची किंमत, EMI यांचाही समावेश होतो. कोणत्याही परिस्थितीत, EMI जास्तीत जास्त कमाईच्या 40 टक्के ठेवा. आपत्कालीन निधीसाठी किमान 10% ठेवा. त्याचबरोबर, 25-30 टक्के बचत करणं आवश्यक आहे.