नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनंतर आता जगभरात मंकीपॉक्स व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्स विषाणू 21 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत 200 हून अधिक प्रकरणे समोर आल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता भारतातही इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) इशारा दिला आहे.
लहान मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे लागेल. सध्या भारतात मंकीपॉक्सची एकही केस आढळलेली नाही. परंतु, या संसर्गाबाबत सरकार हाय अलर्टवर आहे. आतापर्यंत 21 देशांमध्ये मंकीपॉक्सची 226 प्रकरणे समोर आली आहेत, असे ICMR ने म्हटले आहे.
मंकीपॉक्स संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना या आजाराची लक्षणे असलेल्या रूग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयांना सूचना द्याव्यात. ज्यांनी मंकीपॉक्सची लागण झालेल्या देशांमध्ये प्रवास केला आहे अशा रुग्णांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे, असा सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.
ब्रिटनमध्ये ७ मे रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, स्पेन, कॅनडा आणि यूएस या देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.