Monsoon 2024 : उन्हाळ्याचे दिवस आता आणखी किती परीक्षा पाहणार असाच एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे दर दिवशी सातत्यानं होणारी तापमानवाढ. सध्या भारतातील बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळा अडचणी वाढवताना दिसत आहे. वाढत्या उकाड्यामुळं काही भागांमध्ये अवकाळीचं संकट तर, कुठं ढगाळ वातावरणही पाहायला मिळत आहे. वातावरणाची ही एकंदर स्थिती पाहता आता मान्सून कधी येणार हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत असताना Skymet या खासगी हवामान संस्थेनं त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं.
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये भारतात मान्सूनचा पाऊस होईल. हे प्रमाण सरासरी 102 टक्के इतकं असेल. शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत यंदाच्या वर्षी मान्सून 2023 प्रमाणं अनियमित नसून, तो बहुतांशी अंदाज वर्तवल्याप्रमाणं हजेरी लावेल असा अंदाज वर्तवला. या अंदाजनुसार देशात जून ते सप्टेंबर या काळात 868.6 मिमी पावसाची शक्यता आहे. जून महिन्यात पावसाची सरासरी 95 टक्के हजेरी असेल. तर, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरी अनुक्रमे 105, 98 आणि 110 टक्के पाऊस पडेल.
स्कायमेटनं यंदाच्या वर्षी देशाच्या दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागामध्ये समधानकारक पावसाटी शक्यता वर्तवली आहे. तर, देशाच्या पश्चिम आणि मध्य भागामध्ये सामान्यहून अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्वोत्तर भारत आणि देशाच्या पूर्वेकडे असणाऱ्या राज्यांना मात्र हा पाऊस चकवा देणार असून, इथं पाऊस सामान्यहून कमी असेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या मान्सूनच्या अधिक प्रभावाअंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये यंदा समाधानकारक- सामान्य स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, झारखंड, बिहार, ओडिशा आणि बंगाल यांसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये सरासरीहून कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी कर्नाटक, केरळ, गोवा आणि कोकणात सामान्यहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं कोकणकरही सुखावले आहेत.
मान्सूनचा अंदाज दिलासा देणारा असला तरीही अल निनोचं रुपांतर ला निमामध्ये होत असल्यामुळं मान्सूनच्या आगमनास काहीशी दिरंगाई होऊ शके. याशिवाय कमी कालावधीत जास्त पावसासह विविध भागांमध्ये पावसाचं कमीजास्त प्रमाण अशी तफावत या काळात पाहायला मिळू शकते.