यंदाचा पाऊस समाधानकारक; स्कायमेटचा अंदाज

दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार नसली तरी अधिक पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने फेटाळून लावली आहे.

Updated: Feb 25, 2019, 05:52 PM IST
यंदाचा पाऊस समाधानकारक; स्कायमेटचा अंदाज title=

नवी दिल्ली: भारतात यंदा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहील, असा अंदाज 'स्कायमेट' या संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे. पावसाच्या या समाधानकारक अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 'स्कायमेट'ने सोमवारी नैऋत्य मोसमी पावसाविषयीचा प्राथमिक अंदाज जाहीर केला. यामध्ये मान्सूनविषयीच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंदाच्या मान्सूनच्या पावसावर एल-निनोचा अधिक प्रभाव जाणवेल. डिसेंबर महिन्यापर्यंत एल-निनोचा प्रभाव होता. मात्र, त्यानंतर हा प्रभाव कमी होताना दिसत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास एल-निनोचा पावसावर तितकासा परिणाम जाणवणार नाही. यामुळे दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार नसली तरी अधिक पाऊस होण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे यंदा मान्सूनचे प्रमाण समाधानकारक राहील. तसेच मान्सूनची सुरुवात संथ राहील, असे स्कायमेटने म्हटले आहे. 

 जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पडण्याची ५० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. मागील वर्षी २०१८ मध्ये जुलै-सप्टेंबरपर्यंत मान्सूनच्या अखेरीस पाऊस सरासरी ९१ टक्के राहिली. जो हवामान विभागाच्या ९७ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत कमी होता.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दुष्काळी भागाची व्याप्ती वाढत असून पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील आणखी ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली होती. या यादीत यवतमाळ जिल्ह्य़ातील सर्वाधिक ७५१ गावांचा, तर त्याखालोखाल अमरावती जिल्ह्य़ातील ७३१ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, जमीन महसुलात सूट, कृषिकर्जाचे पुनर्गठण आदी आठ विविध प्रकारच्या सवलती राज्य सरकारने लागू केल्या आहेत.