BJP Leader Suicide Case : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विदिशा येथे भाजपच्या (BJP) एका नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्याच्या या धक्कादायक कृतीने कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. संजीव मिश्रा असे भाजप नेत्याचे नाव आहे. आपल्या दोन मुलांच्या आजाराने संजीव मिश्रा हैराण झाले होते. याच कारणावरून गुरुवारी सायंकाळी मिश्रा यांनी पत्नी व दोन मुलांसह विष (Poison) प्राशन केले. यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
भावांनी केले अंत्यसंस्कार
शुक्रवारी भाजप नेते संजीव मिश्रा त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजप नेते संजीव मिश्रा यांच्या धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाला अग्नी दिला. तर त्यांच्या दोन्ही मुलांना मिश्रा यांच्या मोठ्या भावाने अग्नि दिला. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबिंयासह सर्वांनाच अश्रु अनावर झाले. सकाळी 9.45 वाजता पोस्टमॉर्टम करून चारही मृतदेह घरी आणण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 12.30 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
फेसबुकवर लिहीली शेवटची पोस्ट
विदिशा भाजपचे मंडल प्रमुख सुरेंद्र सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदिशाच्या बंटी नगर भागात राहणारे संजीव मिश्रा हे भाजप विदिशा नगर मंडळाचे उपाध्यक्ष होते. ते भाजपचे माजी नगरसेवकही होते. गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास संजीव मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. "ईश्वर दुश्मन के बच्चों को भी ना दें यह बीमारी, मस्कुलर डिस्ट्रॉफी डीएमडी," असे मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
पोस्ट पाहताच नातेवाईंकांनी घेतली घराकडे धाव
मिश्रा यांचा पोस्ट पाहताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरीवाराने त्यांच्या घराकडे धाव घेतली. घरी पोहोचले तर दरवाजा बाहेरून बंद होता. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून आत पाहिले असता चौघेही बेशुद्ध अवस्थेत पडले होते. चौघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादम्यान सर्वांचा मृत्यू झाला.