सावध व्हा! 'हे' आहेत कोरोनाचे देशातील १० 'हॉटस्पॉट'

या ठिकाणांवर कोरोनाचा धोका अधिक बळावत चालला आहे  

Updated: Mar 31, 2020, 09:39 AM IST
सावध व्हा! 'हे' आहेत कोरोनाचे देशातील १० 'हॉटस्पॉट'
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारण आठवड्याभरापूर्वी देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ज्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा कमी होईल अशी शक्यता होती. उलटपक्षी हा आकडा वाढतच गेला. परिणामी आता देशभरात ज्या ठिकाणी कोरोनाची लागण झपाट्याने होऊ लागली आहे, ती ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट म्हणून विशेष निरीक्षणाखाली असणार आहेत. 

मुंबई, पुण्यासह राजधानी दिल्ली आणि केरळमधील काही भागांचाही यामध्ये समावेश आहे. ज्यामध्ये खालील ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा चिंतेची बाब ठरु लागला आहे. 

दिलशाद गार्डन- दिल्ली, निजामुद्दीन- दिल्ली, नोएडा, मेरठ, भिलवाडा, अहमदाबाद, कासारगोड, पथनामथिट्टा, मुंबई, पुणे अशा ठिकाणांचा या ठिकाणी वाढती रुग्णसंख्या आरोग्य विभागापुढील मोठं आवाहन ठरत आहे. 

 

आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणांवर संशयितांच्या चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. शिवाय या भागांमध्ये सक्तीची संचारबंदीही करण्यात येणार आहे. त्यामुळे येते काही दिवस हे कोरोनाशी लढा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच आव्हानात्मक असणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे आतातरी परिस्थितीचं गांभीर्य जाणत नागरिकांनी सावधगिरीने कोरोनाशी लढा देत प्रशासनाचे निर्देश आचरणात आणणं अपेक्षित आहे.