close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी ३० मे रोजी

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे.

Updated: May 26, 2019, 05:54 PM IST
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी ३० मे रोजी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देतील. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मंत्रिमंडळातले काही मंत्रीही याचदिवशी शपथ घेतील. पण यामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेईल का फक्त महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री शपथ घेतील, याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. या शपथविधीमध्ये फक्त भाजपचेच मंत्री शपथ घेणार का मित्रपक्षांमधल्या खासदारांनाही संधी देण्यात येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये भाजपला स्पष्ट बहूमत मिळालं. एकट्या भाजपनेच या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा २७२ असल्यामुळे भाजप बहुमतापासून बरीच पुढे आहे. भाजप आणि एनडीएच्या जागा पकडल्या तर हा आकडा ३५३ जागांवर जातो.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी?

माध्यमांमध्ये सुरु असलेल्या मंत्रिमंडळाच्या बातम्यांवर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी बोलत होते. मंत्रिमंडळ बनवणारे अनेक मोदी आहेत. मंत्रिमंडळाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. भावी मंत्रिमंडळाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. बातम्यांमुळे मंत्रिपद मिळतही नाही आणि मंत्रिपद जातही नाही, असं मोदी म्हणाले.

देशात सध्या अनेक नरेंद्र मोदी तयार झाले आहेत. या सगळ्यांनी आपापल्या अंदाजानुसार मंत्रिमंडळही तयार केले आहे. या सगळ्याचा हिशोब लावायचा झाला तर ५४२ पैकी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, असे पाचपन्नास खासदारच उरतील, अशी मिष्किल टिप्पणी नरेंद्र मोदी यांनी केली.

अनेक नवख्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून बोलतोय, असे खोटे फोन केले जातात. प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या पाहून अनेकांना मंत्रिपद मिळेलच, असे वाटू लागते. काही महाभाग तर या खासदारांना मंत्रिमंडळाच्या अंतिम यादीत तुमचे नाव होतेच, मात्र राष्ट्रपतींकडे जाईपर्यंत त्यामध्ये बदल झाले, अशा भुलथापा देतात. जणूकाही मंत्रिमंडळाची यादी तयार करताना ते माझ्याच बाजूला बसलेले असतात, असा या महाभागांचा आविर्भाव असतो.

त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. हे सर्व फूट पाडण्यासाठी, आपले हेतू साध्या करण्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी केले जात आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल, या भ्रमात राहू नका. कोणाच्याही शिफारशीने मंत्रिपद मिळत नाही. जे काही निकष असतील त्याआधारेच मंत्रिपद मिळेल. माझ्यासाठी कोणीही आपला किंवा परका नाही, जिंकून आलेले सर्वचजण माझे आहेत. शेवटी मंत्रिपद हे मोजक्याच लोकांना मिळू शकते, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.