नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर जग कसं असेल कामकाज कसं चालेल लोकांच्या जीवनशैलीवर काय परिणाम होणार असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनोख्या अंदाजात दिली आहेत. मोदींनी इंग्रजीतील वॉवेल्स अर्थात स्वर 'AEIOU' याद्वारे आपले विचार LinkedIn या सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ते स्वतःतही बदल घडवून आणत आहेत. ते म्हणाले की, कोरोनानंतर नवीन व्यवसाय आणि कार्य संस्कृती AEIOUनुसार नव्याने परिभाषित केली जाईल.
मोदींनी, 'जग कोरोना विषाणूशी लढाई लढत असताना, भारतातील उत्साही आणि नव्या विचारांचे तरुण, निरोगी आणि समृद्ध भविष्याचा मार्ग दाखवू शकतील. या संदर्भात @LinkedIn वर काही विचार शेअर केले गेले असून ते युवक आणि व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहेत.' असं म्हणत मोदींनी ट्विट केलं आहे. मोदींनी शेअर केलेल्या या पोस्टचं नाव 'Life in the era of COVID-19' असं आहे.
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ज्याप्रमाणे इंग्रजी शब्दांमध्ये वॉवेल्सचं (Vowel) AEIOU खास महत्त्व आहे, त्याप्रमाणेच कोरोनानंतर आयुष्यात या शब्दांशी जोडलेल्या अर्थांचं विशेष महत्त्व असणार आहे.
As the world battles COVID-19, India’s energetic and innovative youth can show the way in ensuring healthier and prosperous future.
Shared a few thoughts on @LinkedIn, which would interest youngsters and professionals. https://t.co/ZjjVSbMJ6b
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2020
सहजपणे व्यवस्थापित करता येतील असे व्यवसाय आणि जीवनशैली अवलंबणे ही काळाची गरज आहे. असं केल्यानं, आपण या संकटाच्या वेळी आपला व्यवसाय सुरक्षित ठेवू शकू आणि अशा काळात जीवही वाचवू शकू. डिजिटल पेमेंट हे या काळातील सर्वोत्कृष्ट उदाहरण असू शकतं. मोठ्या किंवा लहान दुकानदारांनाही डिजिटल साधनांमध्ये गुंतवणूक करावी. यामुळे व्यवसायाला अडथळा होणार नाही. भारतात आधीच डिजिटल व्यवहारात वाढ पाहायला आहे.
त्याचप्रमाणे टेलिमेडिसिनचंही उत्तम उदाहरण आहे. यामध्ये दवाखाना किंवा रुग्णालयात न जाता डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. हे भविष्यासाठी एक चांगलं चिन्ह आहे.
आपल्याला नव्याने या अर्थाचा विचार करावा लागेल. कार्यक्षमतेचा अर्थ असा नाही की आपण ऑफिसमध्ये किती वेळ घालवला आहे? प्रयत्नांपेक्षा उत्पादकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देणाऱ्या मॉडेलचा आपण विचार केला पाहिजे. ठराविक मुदतीत काम पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.
अशा व्यवसायाचे मॉडेल विकसित करावे लागेल ज्यामध्ये गरिबांची काळजी घेण्याबरोबरच पृथ्वीच्या सुरक्षेची भावना देखील निर्माण होईल. आपण हवामान बदलाच्या मुद्यावर मोठी प्रगती केली आहे. पृथ्वीने हे सिद्ध केलं आहे की, जर मानवी क्रिया किंवा मानवी हस्तक्षेप कमीतकमी असतील तर पृथ्वी अधिकाधिक खुलत जाईल. म्हणूनच, अशा तंत्रज्ञानाचं भविष्य असेल जे पृथ्वीवरील आपला मानवी हस्तक्षेप कमी करेल.
प्रत्येक संकट स्वतःसह संधी आणते. कोरोना विषाणूही काही वेगळा नाही. अशा परिस्थितीत आपण नवीन संधी / विकासाच्या नवीन क्षेत्रांविषयी मूल्यमापन केलं पाहिजे. हे आपल्या लोकांच्या आधारावर, आपली क्षमता आणि आपल्या योग्यतेच्या आधारावर केलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत कोरोनानंतरच्या जगात भारत अग्रगण्य भूमिकेत दिसू शकतो.
कोरोना व्हायरस वंश, धर्म, जाती, समुदाय, भाषा आणि सीमा पाहत नाही. अशा परिस्थितीत आपली वागणूक प्रामुख्याने ऐक्य आणि बंधुतेच्या भावनेने रुजली गेली पाहिजे.