भारताचे असेही इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी प्रेरणा

National Engineers Day: एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 15, 2023, 11:36 AM IST
भारताचे असेही इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी प्रेरणा title=

National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाचा सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया. 

विश्वेश्वरय्या

विश्वेश्वरय्या यांनी आपल्या वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत जिद्दीने आणि उर्जेने इंजिनीअरिंगचे प्रश्न सोडवत राहिले. त्यामुळे आजच्या काळातही ते प्रत्येक प्रकारच्या अभियंत्यासाठी एक उदाहरण बनले आहेत. त्यांच्या जन्म दिवसानिमित्त 15 सप्टेंबर रोजी इंजिनीअरिंग दिवस साजरा केला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी म्हैसूर राज्यातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर तालुक्यात एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांचे बालपण खूपच हालाखीत गेले. त्यांच्याकडे अभ्यासासाठी पुरेसे पैसे नसायचे. विविध अडथळे पार करत त्यांनी सेंट्रल कॉलेज, बंगळूरमधून बीएची पदवी मिळवली.

एडिसन ऑफ इंडिया

भारताचे एक इंजिनीअर तर अवघे तिसरी उत्तीर्ण होते. जीडी नायडू असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म 23 जून 1983 रोजी झाला. शाळेत जायला त्यांना आवडायचे नाही पण तांत्रिक कामात त्यांचे मन रमायचे. हाती कोणतीही डिग्री नसताना त्यांनी खूप अविष्कार केले. 1937 मध्ये त्यांनी बालसुंदरम नायडू यांच्यासोबत मिळून पहिली इलेक्ट्रॉनिक मोटार बनवली. यानंतर इलेक्ट्रॉनिक ज्यूसर, रेझर, टेंपर प्रूफ वोटिंग मशिन आणि केरोसिनवर चालणारा पंखा बनवला. नायडू यांच्या अशा कर्तबगारीमुळे त्यांना मिरेकल मॅन आणि एडिसन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. 

पहिल्या महिला सिव्हिल इंजिनीअर

शकुंतला ए भगत या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनीअर म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी काश्मिर ते अरुणाचलपर्यंत एकूण 69 पूल बांधले. मुंबईतील वीर जिजाबाई प्रौद्योगिक संस्थेतून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्या आयआयटी मुंबईमध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या. त्यानंतर त्या हेवी स्ट्रक्चर लॅबोरिटीच्या प्रमुखदेखील होत्या. 

सूपर कॉम्प्युटरचे निर्माता विजय भाटकर 

1980 मध्ये 'क्रे' ही अमेरिकन कंपनी जगातील एकमेव सुपर कॉम्प्युटर बनवणारी कंपनी होती. त्यावेळा तांत्रिक संशोधनासाठी भारताला सूपर कॉम्प्युटरची गरज होती. अशावेळी भारताने क्रेकडून सूपर कॉम्प्युटर विकत घेण्याचा निर्णय घेतला पण क्रेने त्याला नकार दिला. भारत याचा उपयोग संशोधन नव्हे तर सैन्याच्या मदतीसाठी करेल,असे त्यांचे म्हणणे होते. अशावेळी 1988 मध्ये विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कॉम्प्युटिंगची स्थापना करण्यात आली. 1991 मध्ये सी डॅकने भारताला पहिला सूपर कॉम्प्युटर दिला. याचे नाव परम असे ठेवण्यात आले.