काँग्रेसने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे लष्कराची हेळसांड; मोदींची घणाघाती टीका

बोफोर्सपासून ते सध्याच्या वादग्रस्त हेलिकॉप्टर घोटाळ्याचे धागेदोरे एकाच कुटुंबापर्यंत येऊन पोहोचतात.

Updated: Feb 25, 2019, 09:20 PM IST
काँग्रेसने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे लष्कराची हेळसांड; मोदींची घणाघाती टीका title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील इंडिया गेट येथे राष्ट्रीय युद्धस्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, पूर्वीच्या सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे भारतीय लष्कराची हेळसांड झाली. बोफोर्सपासून ते सध्याच्या वादग्रस्त हेलिकॉप्टर घोटाळ्याचे धागेदोरे एकाच कुटुंबापर्यंत येऊन पोहोचतात. ही परिस्थिती खूप काही सांगून जाणारी आहे. आता याच लोकांना भारतात राफेल विमाने उडून द्यायची नाहीत, असे सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे गांधी घराण्याला लक्ष्य केले. 
 
या सोहळ्याला तीनही सैन्यदलांचे प्रमुख आणि माजी सैनिक उपस्थित होते. त्यांना उद्देशून मोदींनी म्हटले की, आमचे सरकार नेहमीच देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने काम करत राहील. सैनिकांसाठी अत्याधुनिक शस्त्र खरेदीसाठी सुरुवात झाली आहे आम्ही लवकरच सैनिकांसाठी तीन सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणार असल्याची घोषणाही यावेळी मोदींनी केली. 

इंडिया गेट येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात एक भली मोठी भिंत उभारण्यात आली असून, त्यावर प्रत्येक हुतात्म्याचे नाव कोरण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सैन्यदलांकडून एक राष्ट्रीय युद्ध स्मारक असावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. २०१५ मध्ये सरकारने या कामाला सुरूवात केली. आज त्याचे लोकार्पण झाले. हे स्मारक देशाला प्रेरणा देत राहील, असे मोदींनी सांगितले.