देशात दिवसभरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू; जाणून घ्या आतापर्यंतची रुग्णसंख्या

देशातील रुग्णसंख्येत आणखी हजारोंची भर ....   

Updated: Aug 19, 2020, 10:45 AM IST
देशात दिवसभरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू; जाणून घ्या आतापर्यंतची रुग्णसंख्या  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. असं असलं तरीही दर दिवशी देशात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा परिस्थितीत आणखी चिंतेची भर टाकत आहे. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा देशात ६० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशात तब्बल ६४,५३१ नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. यातच चिंता वाढवणारी बाब म्हणजे देशभरात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी १०९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडासुद्धा आरोग्य यंत्रणेपुढं आव्हान उभं करत आहे. 

आतापर्यंत देशात अतिशय झपाट्यानं फैलावणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात तब्बल २७,६७,२७४ जण आले आहेत. यापैकी कोरोनावर मात केलेल्यांचा आकडाही तितकाच मोठा आहे. जवळपास २० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार कोरोनावर मात करत रुग्णालयातून रजा मिळालेल्यांची संख्या २०,३७,८७१ इतकी झाली आहे. तर, सद्यस्थितीला देशात ६,७६,५१४ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळं देशातील मृतांचा आकडा ५२,८८९ वर पोहोचला असल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

 

दरम्यान, हजारोंच्या घरात असणारी ही आकडेवारी चिंतेत टाकणारी असली तरीही यामध्ये एक दिलासा देणारी बाबही समोर आली आहे. देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढच झाली, तरीही मागच्या पाच दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. देशाचा मृत्यूदरही कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आता देशातील कोरोनाचा पीक पॉईंट संपला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.