'पंतप्रधान मोदीही इमरान खान यांचा फोन घेत नाहीत', नवाझ शरीफांच्या मुलीनं हिणवलं

'मोदी आणि जगातील इतर राष्ट्राध्यक्ष इमरान खान यांना योग्य तो सन्मान का देत नाहीत?'

Updated: May 29, 2019, 09:03 AM IST
'पंतप्रधान मोदीही इमरान खान यांचा फोन घेत नाहीत', नवाझ शरीफांच्या मुलीनं हिणवलं title=

लाहोर : सध्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम यांनी मंगळवारी इमरान खान यांच्यावर निशाणा साधला. 'भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले पाकिस्तानी समकक्ष असलेल्या पंतप्रधान इमरान खान यांना सन्मानही देत नाहीत... फेब्रुवारी महिन्यात तर मोदींनी इमरान यांचा फोनही घेतला नाही' असं म्हणत त्यांनी इमरान खान यांची हेटाळणी केलीय.

पाकिस्तानात १९९८ च्या अणुशक्ती परिक्षणासंबंधी मॉडेल टाऊनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मरियम बोलत होत्या. इमरान खान यांनीच तक्रार केली होती की भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला फोन घेतला नाही. त्यावेळी दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते.

शक्तिशाली सेनेचा उल्लेख करताना मरियम यांनी म्हटलं 'मोदी आणि जगातील इतर राष्ट्राध्यक्ष इमरान खान यांना योग्य तो सन्मान का देत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की ते कुणाच्या मदतीनं लोकांची मतं चोरून सत्तेत आलेत... आणि कुणाच्या इशाऱ्यावर चालतात'.

हेच इमरान नवाझ शरीफ यांचा उल्लेख करताना 'मोदींचा मित्र' म्हणत असत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

'इमरान खान... तुमचा दर्जा एखाद्या कठपुतळ्याहून जास्त नाही. जगात तुम्हाला कुठेही मान-सन्मान नाही' असं म्हणत त्यांनी इमरान खान यांच्यावर तोंडसुख घेतलं.