'त्या' ऑफरसाठी मी पंतप्रधान मोदींची आभारी आहे- सुप्रिया सुळे

शरद पवार हे केवळ माझे वडील नाहीत तर ते माझे बॉसही आहेत.

Updated: Dec 3, 2019, 09:10 PM IST
'त्या' ऑफरसाठी मी पंतप्रधान मोदींची आभारी आहे- सुप्रिया सुळे

नवी दिल्ली: महाराष्ट्रात भाजपला साथ देण्याच्या मोबदल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देण्याचीही तयारी दर्शविली होती, असा गौप्यस्फोट नुकताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी असा प्रस्ताव ठेवला, हे त्यांचे मोठेपण आहे. यासाठी मी त्यांची आभारी आहे. मात्र, ती गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकली नाही, असे सुप्रिया यांनी सांगितले. 

यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातही भाष्य केले. अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. हे आमचे वैयक्तिक तसेच पक्षीय स्तरावरील प्रकरण आहे. त्यामुळे मी अजित पवारांकडे नेहमीच मोठे बंधू आणि पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून बघेन, असे सुप्रिया यांनी म्हटले. 

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ऑफर विनम्रपणे नाकारण्याचा शरद पवार यांचा निर्णय योग्यच होता. शरद पवार हे केवळ माझे वडील नाहीत तर ते माझे बॉसही आहेत आणि बॉस कधीच चूकत नाही, असेही यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

शरद पवार यांनी सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपने दिलेल्या ऑफरविषयी गौप्यस्फोट केला होता. राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत मोदींची भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर मोदींनी मला थांबण्यास सांगितले आणि माझ्यासमोर एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. आपण एकत्रित काम केले तर मला त्याचा आनंद होईल, असे मोदी म्हणाले. त्यावर आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत आणि ते यापुढेही राहतील. पण राजकीयदृष्ट्या तुमच्यासोबत काम करणे मला शक्य होणार नाही, असे सांगत मी त्यांची ऑफर नाकारल्याचे पवारांनी स्पष्ट केले होते.