राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार अटकेत

छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना अटक झाली होती.

Updated: Dec 21, 2017, 08:12 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार अटकेत title=

अहमदाबाद : छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना अटक झाली होती. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार अटकेत गेला आहे. गुजरातमधले राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांना अटक करण्यात आली आहे. दंगल करणं आणि एका पोलीस अधिकाऱ्याला हाणामारी केल्यामुळे जडेजा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

तीनच दिवसांपूर्वी गुजरात निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीमध्ये जडेजा पोरबंदर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. जडेजा आणि अन्य सात जणांना दंगल करणं आणि पोलिसाला हाणामारी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक शोभा भुटादा यांनी दिली आहे.

कंधाल जडेजा, त्यांचे दोन भाऊ करण जडेजा आणि कना जडेजा, तसंच आणखी काही जणांनी रानावाव पोलीस स्टेशनमध्ये सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जबरदस्ती घुसखोरी केली आणि राजकीय विरोधक सामत गोगान यांना हाणामारी केली, असा आरोप आहे. गोगान हे हल्ल्याच्या भीतीमुळे पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसले होते.

आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिकडे उपस्थित असलेल्या गोगान आणि पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये हंगामा केला. नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीवरून जडेजा गोगान यांच्यावर नाराज होते आणि त्यांचा शोध घेत होते. यावेळी गोगान पोलीस स्टेशनमध्ये होते, अशी माहिती रानावाव पोलीस स्टेशन निरीक्षक एनडी परमार यांनी दिली आहे.

गोगान यांनी जडेजा यांच्या इच्छेविरोधात अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण गोगान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असं परमार म्हणाले. जडेजा आणि अन्य आरोपींवर कलम १४३(बेकायदेशीररित्या एकत्र येणं), १४७(दंगल पसरवणं), ५०४(अपमान करणं), ४२७(नुकसान पोहोचवणं), ३३२(सरकारी कर्मचाऱ्याला काम करताना रोखणं आणि हल्ला करणं) आणि १८६(लोकसेवकाला रोखणं) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.