भारताला आणखी १० वर्षे कणखर आणि स्थिर सरकारची गरज- अजित डोवाल

कमकुवत आणि आघाड्यांचे अस्थिर सरकार असल्यास काही धोके निर्माण होऊ शकतात.

Updated: Oct 26, 2018, 10:52 AM IST
भारताला आणखी १० वर्षे कणखर आणि स्थिर सरकारची गरज- अजित डोवाल title=

नवी दिल्ली: भारताला आणखी दहा वर्षे तरी खंबीर आणि ठामपणे निर्णय घेणाऱ्या सरकारची गरज आहे, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. 
 
 यावेळी अजित डोवाल यांनी म्हटले की, सध्या भारताला बाहेरच्यांपेक्षा आतील लोकांकडूनच धोका आहे. अशा परिस्थितीत देशाला राजकीय आणि धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करायची असतील तर आणखी दहा वर्षे तरी देशात खंबीर सरकार असलेच पाहिजे, असे डोवाल यांनी म्हटले. 
 
कमकुवत आणि आघाड्यांचे अस्थिर सरकार असल्यास काही धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. हे निर्णय लोकप्रिय असतीलच असे नव्हे, असेही डोवाल यांनी सांगितले. 

तसेच भारताला बाहेरच्यांपेक्षा आतील शक्तींकडूनच अधिक धोका आहे. या शक्तींकडून देशाची इच्छाशक्ती कमकुवत करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. 

लोकशाही सशक्त नसेल तर देश मवाळ होण्याची भीती असते. आगामी काही वर्षे तरी भारताला मवाळ राहण्याचा धोका पत्करणे परवडणार नाही. भारताने मवाळ आणि कणखर अशी संयुक्त रणनीती स्वीकारायला पाहिजे. जेणेकरून कठोर निर्णय घेता येतील. मात्र, तुम्ही देशहितापेक्षा राजकीय हिताला प्राधान्य दिल्यास याच्याशी तडजोड करावी लागले, असे डोवाल यांनी सांगितले. 

त्यामुळे आणखी दहा वर्षे देशाला कणखर आणि स्थिर सरकार मिळाल्यास राष्ट्रीय, राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक अशी सर्व प्रकारची उद्दिष्टे साधली जातील, असा विश्वास डोवाल यांनी व्यक्त केला.