मामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा

मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 17, 2024, 12:17 PM IST
मामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा title=

मध्यप्रदेशात पत्नी आणि भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने आपल्या मित्रांसोबत मिळून मामाची हत्या केली. धक्कादायक म्हणजे हत्येत सहभागी मुलं अल्पवयीन होती. पण पोलिसांनी फक्त 12 तासांमध्ये हत्येचा उलगडा केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून, यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 

विदुर नगरमध्ये पोलिसांनी रुपसिंह राठोड नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवी असता या हत्येत त्याचा भाचा शुभम सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भाचासहित हत्येत सहभागी त्याच्या 4 मित्रांना अटक केली आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीलाही बेड्या ठोकल्या आहेत. मृत व्यक्तीच्या 6 वर्षीय मुलामुळे गुन्ह्याचा उलगडा झाला. तपासादरम्यान पोलिसांना भाचा आणि मामी यांच्यात अवैध प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली. 

मामा आणि भाच्यात प्रेमसंबंध

अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या पत्नी आणि भाच्यात प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांसह मिळून मामाची हत्या केली. मामीने आपल्या भाच्याच्या मदतीने उशीने तोंड दाबून रुपसिंह राठोड यांची हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेह नाल्याशेजारी फेकून दिला होता. जेणेकरुन अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे असं वाटावं.

6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा

पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर वेगाने तपास सुरु केला होता. सर्वात प्रथम त्यांनी नातेवाईक आणि 6 वर्षाच्या मुलाची चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याची शंका आली. 

मुलाने पोलिसांना सांगितलं की, आई आणि वडिलांमध्ये नेहमी भांडण होत होतं. यानंतर पोलिसांनी पूजाचा मोबाईल तपासला. यावेळी तिने आपल्या मोबाईलवरुन अनेक वेळा शुभमला व्हिडीओ कॉल केला असल्याचं पोलिसांना आढळलं. यानंतर पोलिसांची संशयाची सुई दोघांकडे वळली. 

पोलिसांनी पूजा आणि शुभम दोघांनाही ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवल्यानंतर दोघांनी हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, हत्येनंतर सगळेजण आपापल्या घऱी गेले होते आणि खाटू श्यामला जाण्याची तयारी करत होते. पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे.