शुभ मुहूर्तावर कार घेतली, मंदिरात विधिवत पूजाही केली; अन् नारळावरुन कार नेतानाच घडला भयंकर अपघात

Crime News In Marathi: नवीन कार घेतली सहकुटुंब पूजा करण्यासाठी मंदिरात गेले मात्र देवीच्या समोरच घडला भयंकर अपघात 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 19, 2023, 12:09 PM IST
शुभ मुहूर्तावर कार घेतली, मंदिरात विधिवत पूजाही केली; अन् नारळावरुन कार नेतानाच घडला भयंकर अपघात title=
New Vehicle collides with temple wall one beggar dead in

Crime News Today: नवीन गाडी खरेदी केल्यानंतर आपण पहिले पूजा करतो. जेणेकरुन सर्व विघ्न दूर होऊन सर्व सुरळीत होईल. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये अशी एक घटना घडली आहे. ज्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. इटावा येथील एका व्यक्तीने नवीन गाडी घेतली त्यानंतर गाडीची पूजा करण्यासाठी ते मंदिरात पोहोचले. पुजाऱ्यांनी गाडीची पूजा संपन्न झाल्याचे जाहिर केले. त्यानंतर गाडीच्या चाकाच्या खाली नारळ ठेवून त्यावरुन गाडीचे चाक नेण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी भयंकर घडलं. 

नारळावरुन गाडीचे चाक नेण्यास सांगितल्यानंतर चालकाने गाडी सुरू केली मात्र गाडी अनियंत्रित होऊन मंदिरासमोर भीक मागत असलेल्या भिकाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक महिला भिकारी गंभीररित्या जखमी झाली आहे. अपघातानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने घोषित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, इटावा शहरातील सिद्ध पीठ काली मंदिरात बुधवारी काही जण बोलेरो गाडी घेऊन मंदिरात गेले होते. नवीनच कार खरेदी केली होती त्यामुळं गाडीची पूजा करण्यासाठी ते आले होते. पुजाऱ्याने पुजा संपवली. त्यानंतर गाडी नारळावरुन पुढे चालवायला सांगितली. मात्र त्याचवेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी तिने असलेल्या भिकाऱ्यांना घेऊन फरफटत निघून गेली. 

या अपघातात 50 वर्षांचा व्यक्ती कुंवर सिंह याचा मृत्यू झाला आहे. तर, 60 वर्षांची महिला निर्मला देवी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. हे दोघही मंदिरासमोर भीख मागून गुजराण करतात. ज्या वेळी हा अपघात घडला तेव्हा दोघही एकत्रच बसले होते. 

निर्मला देवी यांच्या म्हणण्यानुसार, चालकाने मद्यपान केले होते. त्यामुळंच हा अपघात घडला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती हा निर्मला देवी यांचा भाऊ होता. तर, या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर निर्मला देवी हिला रुग्णालयात दाखल केले. तर, पोलिसांनी गाडीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांनाही पुजेसाठी वेगळे स्थान निवडण्यास सांगितले आहे. तसंत, याप्रकारे निष्काळजीपणाकरुन पूजा न करण्याबाबतही तंबी दिली आहे. 

बुधवारी रात्री साडआढच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. तर, गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.