चंदीगड: लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलीस अधिकाऱ्याचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. यामध्ये आणखी काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. हे सर्वजण सनोर भाजीपाला मार्केटच्या परिसरात वाहन घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांकडे कर्फ्यु पासची विचारण केली. मात्र, या टोळक्याकडे कोणतेही पास नसल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.
...तर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही- अजित पवार
एवढेच नव्हे तर या टोळक्याने पोलिसांवर लावलेल्या बॅरिकेटसवर गाडी घातली. यानंतर त्यांनी गाडीतून खाली उतरत पोलिसांवर हल्ला केला. यापैकी एकाने सहायक पोलीस उपनिरीक्षक हरजित सिंग यांचा हात तलवारीने कापून टाकला. तर अन्य दोन अधिकारीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर निहंग्यांचे हे टोळके बलबेडा परिसरातील खिसरी साहेब गुरुद्वारात जाऊन लपून बसले आहे. पोलिसांनी या गुरुद्वाराला घेरले असून या सर्वांना शरण येण्यास सांगितले आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी: धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण
पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १३२ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, देशातील इतर भागांप्रमाणे याठिकाणीही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यापूर्वी गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही पोलीस व डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.