नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांनाच मनस्ताप होतो आहे. अशात सरकार वाहनधारकांना दिलासादायक बातमी देण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार एका नव्या आराखड्यावर काम करत आहे. सरकारची ही नीति जर योग्य ठरली तर पेट्रोलच्या किंमती अर्ध्या होऊ शकतात. यासोबतच सरकार यामाध्यमातून वाहनांमुळे होणारं प्रदुषण कमी करण्याचाही प्रयत्न करणार आहे. सरकारकडून लवकरच एका आराखड्याची घोषणा केली जाऊ शकते.
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘सरकार लवकरच पेट्रोलमध्ये १५ टक्के मेथेनॉल मिक्स करण्याचा विचार करत आहे. याने पेट्रोलची किंमत कमी करण्यास आणि प्रदुषण कमी करण्यास मदत मिळेल. संसदेच्या आगामी सत्रात मी पेट्रोलमध्ये १५ टक्के मेथेनॉल मिक्स करण्याच्या नितीची घोषणा करणार आहे. मेथेनॉल कोळशापासून बनवले जाऊ शकते आणि यासाठी खर्च २२ रूपये प्रति लिटर असते तर पेट्रोलची किंमत ८० रूपये प्रति लिटर पडते.
चीन हे पेट्रोल १७ रूपये प्रति लिटरच्या खर्चातून निर्मित करत आहे. गडकरी म्हणाले की, ‘याने खर्च कमी आणि प्रदुषणही कमी होईल. मुंबईतील दीपक फर्टीलायझर्स आणि राष्ट्रीय रसायन अॅन्ड फर्टीलायझर्ससारखे कारखाने मेथेनॉलचं उत्पादन करु शकतात. ते म्हणाले की, वोल्होने अशा इंजिनची निर्मिती केली आहे जे मेथेनॉलवर चालू शकतं. तर मुंबईत अशा २५ बस चालवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
गडकरी म्हणाले की, ऎथेनॉलचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी पेट्रोलियम मंत्र्यांना याचा प्रस्तावही पाठवला आहे. या प्रस्तावात सांगण्यात आलं आहे की, ७० हजार कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात येणा-या पेट्रोल रिफायनरी स्थापन करण्याच्या तुलनेत ऎथेनॉलच्या उपयोगावर लक्ष द्यावं.