नवी दिल्ली : विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (Gas Cylinder)५३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्याच महिन्यात १५० रुपयांनी सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे गृहिणींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर (Domestic Gas Cylinder) ५३ रुपयांनी स्वस्त झाल्याने महागाईत थोडासा दिलासा मिळाला आहे.
आजपासून घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे ८९३.५० रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर (१४,२ किलोग्रॅम) मार्च महिन्यात ८४१ रुपयांना मिळणार आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर५३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती बदलल्याने सिलिंडरच्या किमतीत घसरण झाली आहे.
मार्च महिन्यात गॅस कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचे (१९ किलोग्रॅम) दर ८५ रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना केवळ १४६५ रुपयांत सिलिंडर मिळणार आहे. तसेच ५ किलोग्रॅमचा सिलिंडरदेखील १८.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे हा सिलिंडर ग्राहकांना केवळ ३०८ रुपयांत मिळणार आहे. अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर ५१५ रुपयांना मिळणार आहे.