मुंबई : देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron India Cases) दाखल झाला आहे. तसेच राज्यातही रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब अशी की एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. राजस्थानमधीन जयपूरमध्ये हे 9 जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. या कुटुंबाला प्रवासाचा इतिहास होता. हे कुटुंब ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून जयपूरमध्ये आलं होतं. (Omicron India Cases 9 people were infected with the new corona variant Omicron in jaipur rajasthan)
राज्याचा ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 8 वर जाऊन पोहचला आहे. आज रविवारी (5 डिसेंबर) दिवसभरात एकूण 7 जण आढळले आहेत. यामध्ये 6 जण हे पिंपरी चिंचवडमधील आहेत. तर उर्वरित एक रुग्ण हा पुण्यातील आहे. तसेच राजधानी दिल्लीतही 1 रुग्णाची नोंद झाली आहे.
गुजरातमध्येही शिरकाव
शनिवारी गुजरातमधील जामनगरमध्ये एका वयस्कर व्यक्तीला ओमायक्रॉन असल्याचं स्पष्ट झालं. याआधी कर्नाटकात 2 जण आढळून आले. त्यामुळे देशात आतापर्यंत एकूण 21 ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
एक 44 वर्षीय महिला 2 मुलीसंह नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आली होती. ती आपल्या भावाला भेटायला आली होती. या महिलेच्या संपर्कात 2 मुली, भाऊ आणि त्याच्या 2 मुली अशा एकूण 6 जण ओमायक्रॉनबाधित आढळले. यापैकी 3 जण हे अल्पवयीन आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये 6, डोंबिवली आणि पुण्यात प्रत्येकी 1
पिंपरी चिंचवडमधील 6 जणांसह पुण्यात एक रुग्ण आढळला आहे. हा तरुण 18 ते 25 नोव्हेंबरदरम्यान फिनलंड फिरून आला होता. या तरुणाला 29 नोव्हेंबरला साधारण ताप आला. यानंतर त्याने कोरोना टेस्ट केली ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
देशात कुठे आणि किती ओमायक्रॉन रुग्ण? (Omicron India Cases)
महाराष्ट्र
डोंबिवली - 1
पुणे - 1
पिंपरी चिंचवड - 6
कर्नाटक - 2
गुजरात - 1
राजस्थान -9
दिल्ली - 1
दरम्यान देशात ओमायक्रॉन या नव्या विषाणूने बाधित रुग्णांचा आकडा हा 21 वर पोहचलेला आहे.
सोमवारी टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक
दरम्यान राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता उद्या म्हणजेच सोमवारी टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्त्वाची बैठक होणार आहे. ओमायक्रॉनचा सामना कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत तज्ज्ञ मंडळी उपस्थित असणार आहेत.