कोईम्बतुर : तामिळनाडुतल्या कून्नुर इथं झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि ११ जणांचा मृत्यू झाला. आज या सर्वांचं पार्थिव मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये आणले जात आहेत. पार्थिव रेजिमेंटल सेंटरमधून सुलूर एअरबेसवर नेलं जात असताना ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहीका बाजुच्या टेकडीवर आदळली.
अपघात गंभीर नाही
प्राथमिक माहितीनुसार अपघात फारसा गंभीर नाही. यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. मद्रास रेजिमेंटल सेंटर ते सुलूर एअरबेसकडे जाताना मेट्टुपालयमजवळ हा अपघात झाला. आज संध्याकाळपर्यंत पार्थिव सुलूर एअरबेसवरून विमानाने दिल्लीला आणले जाणार आहेत.
मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये वाहिली श्रद्धांजली
तामिळनाडूतील कुन्नूर इथं बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिया रावत आणि अन्य 11 लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मृतांचे पार्थिव वेलिंग्टन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. गुरुवारी सकाळी संपूर्ण लष्करी सन्मानाने पार्थिव मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये आणण्यात आले. रेजिमेंटर सेंटरमध्ये श्रद्धांजली सभेनंतर पार्थिव आता दिल्लीला पाठवण्यात येत आहेत.