जम्मू : भारतामध्ये अयोध्या वाद भडकविण्यासाठी देशातील मौलवींना पाकिस्तानातून पैसा दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप शिया वक्फ बोर्डाने केला आहे.
शिया केंद्रीय वक्फ बोर्ड, उत्तर प्रदेशचे अध्यक्ष सईद वसीम रिझवी यांनी हा आरोप केला आहे. रिझवी यांनी म्हटले आहे की, अयोध्या जमीन वादावर देशात असलेल्या शांततेचा भंग करण्यासाठी काही लोक पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. तसेच, हे लोक पाकिस्तानच्या नादाला लागून धार्मिक मुद्दे उपस्थित करून देशाला अस्थिर करू पाहात आहेत. पुढे बोलताना रिझवी यांनी आरोप केला आहे की, अयोध्या मुद्द्यावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. कारण, यात पाकिस्तानचा मोठा हात आहे. अयोध्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकांचा पाकिस्तानशी थेट संबंध आहे, असाही खळबळजनक आरोप केला आहे.
दरम्यान, शिया केंद्रीय वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला गेल्याच महिन्यात म्हटले होते की, वादग्रस्त जागेपासून योग्य अंतर ठेऊन मुस्लिम परिसरात एका मशिदीची उभारणी करावी. शिया केंद्रीय वक्फ बोर्डाच्या या मुद्द्यावर संमिश्र प्रतिक्रीया आल्या आहेत. काही लोकांनी बोर्डाचे स्वागत केले आहे. तर, काहींनी विरोध.