पाकिस्तानच्या हवाई हद्दीत भारतावर पुन्हा निर्बंध

पाकिस्तानमधील नऊपैकी तीन हवाई मार्ग भारतासाठी बंद झाले आहेत.

Updated: Aug 8, 2019, 08:19 AM IST
पाकिस्तानच्या हवाई हद्दीत भारतावर पुन्हा निर्बंध title=

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्याची बाब पाकिस्तानला चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान एकापाठोपाठ एक भारताविरुद्ध निर्णय घेताना दिसत आहे. 

पाकिस्तानने नुकतीच भारताशी द्विपक्षीय चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाकिस्तान सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर आता पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीबाबत नवे नियम लागू केले असून त्यामुळे भारतातून उड्डाण करणाऱ्या विमानांवर निर्बंध आले आहेत. त्यानुसार पाकिस्तानमधील नऊपैकी तीन हवाई मार्ग भारतासाठी बंद झाले आहेत.

पाकिस्तान हवाई उड्डाण प्राधिकरणाच्या (पीसीएए) आदेशानुसार, लाहोरमधून जाणाऱ्या सर्व विमानांना कमी उंचीवरून उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरून जाताना विमाने ४६ हजार फुटांपेक्षा खाली आणू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अफगाणिस्तानमधून येणाऱ्या एका विमानाला ऐनवेळी मार्ग बदलण्याच्या सूचना 'पीसीएए'कडून देण्यात आल्याचे समजते. 

सहा ऑगस्ट ते पाच सप्टेंबरदरम्यान हे हवाई निर्बंध लागू असतील. यापूर्वी बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. त्यानंतर १६ जुलै भारतीय विमानांसाठी ती खुली करण्यात आली होती.

तत्पूर्वी बुधवारी पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्रदिनी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णयही पाकिस्तानने घेतला आहे.