जेवण आणि पाणी घरुनच आणा; रेल्वेच्या प्रवाशांना सूचना

कॅटरिंगमधील तयार जेवणाचा पर्याय रेल्वेकडून बंद करण्यात आला आहे. 

Updated: May 11, 2020, 05:36 PM IST
जेवण आणि पाणी घरुनच आणा; रेल्वेच्या प्रवाशांना सूचना title=

नवी दिल्ली: अनेक दिवसांच्या लॉकडाऊनंतर १२ मे पासून अखेर रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला प्रारंभ होणार आहे. अनेक लोक रेल्वेने आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे साहजिकच रेल्वे सेवेवर मोठा ताण पडणार आहे. यासाठी देशभरातील रेल्वेसेवा टप्याटप्याने सुरु होईल.

रेल्वेचे संकेतस्थळ क्रॅश;ऑनलाईन बुकिंगचे तीनतेरा

या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून प्रवाशांसाठी काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवासादरम्यान लोकांनी जेवण आणि पाणी घरूनच आणावे, असा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वेच्या IRCTC या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिकिटांच्या ऑनलाईन आरक्षणाला सुरुवात होईल. आज चार वाजता ऑनलाईन बुकिंगला सुरुवात होणार होती. मात्र, एकाचवेळी अनेक लोक संकेतस्थळावर आल्यामुळे रेल्वेची साईट क्रॅश झाली. त्यामुळे आता पुन्हा सहा वाजल्यापासून IRCTC ची साईट सुरु होईल. 

या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रेल्वेच्या तिकीटाच्या रक्कमेत खानपान (कॅटरिंग) शुल्काचा समावेश नसेल.कॅटरिंगमधील तयार जेवणाचा पर्याय रेल्वेकडून बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी IRCTC कडून मोजक्या खाद्यपदार्थ्यांची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. मात्र, त्यासाठी प्रवाशांना वेगळे पैसे भरावे लागतील. शक्यतो प्रवाशांनी स्वत:च्या घरुनच खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी आणावे, असे रेल्वेने म्हटले आहे. याशिवाय, तिकीट कन्फर्म असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. तसेच सर्व गाड्या वातानुकूलित असून संपूर्ण प्रवाशी क्षमतेसह धावतील. तसेच प्रवाशांना ब्लँकेट, चादर, उशी या सुविधा पुरवण्यात येणार नाहीत.