Patna Railway Station वर जाहिरातींऐवजी अश्लील Video प्ले झाला अन्...; गुन्हा दाखल

Patna Railway Station Obscene Film: हा संपूर्ण प्रकार त्यावेळी घडला जेव्हा रेल्वे स्थानकावरील पलाटावर अनेक प्रवासी ट्रेनची वाट पाहत उभे होते. संबंधित चित्रफित प्रकाशित झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.

Updated: Mar 20, 2023, 02:55 PM IST
Patna Railway Station वर जाहिरातींऐवजी अश्लील Video प्ले झाला अन्...; गुन्हा दाखल title=
Patna Junction Railway Station

Patna Railway Station: बिहारची (Bihar) राजधानी असलेल्या पाटण्यामधील पटणा जंक्शन रेल्वे स्थानकावर (Patna Railway Junction) रविवारी एक विचित्र प्रकार घडला. ट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना घडलेला प्रकार पाहून धक्काच बसला. येथील दानापूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या पटणा जंक्शनवर लावण्यात आलेल्या टीव्हीवर अचानक जाहिरातींऐवजी अश्लील चित्रफित (ब्लू फिल्म) सुरु झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास पटणा रेल्वे स्थानकातील 10 व्या फ्लॅटफॉर्मवरील टीव्ही स्क्रीनवर अश्लील चित्रफित प्रसारित झाली. यानंतर रेल्वे स्थानकामध्ये एकच गोंधळ उडाला.

या कारणामुळे दिसली चित्रफित

हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा प्लॅटफॉर्मवर अनेक प्रवासी होते. अनेक लोक आपल्या कुटुंबियांबरोबर ट्रेनची वाटत पाहत उभे असतानाच हा व्हिडीओ प्ले झाला. अचानक समोरील मोठ्या स्क्रीनवर अश्लील चित्रफित सुरु झाल्याने अनेकांना धक्काच बसला. या प्रकारानंतर जाहिरात करणाऱ्या एजन्सीच्या कंट्रोल रुममध्ये छापेमारी करण्यात आली असता या प्रकरणामागील खरं कारण समोर आलं. या कंट्रोल रुममध्ये काम करणारे कर्मचारी ही अश्लील चित्रफित पाहत होते. आरपीएफच्या जवानांना पाहताच कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांनी ही अश्लील चित्रफित डिलीट केली. जवळजवळ 3 मिनिटं ही अश्लील चित्रफित दाखवण्यात आली.

कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये

अश्लील चित्रफित रेल्वे स्थानकावरील मोठ्या स्क्रीनवर प्रसारित केली जात असल्याची माहिती जीआरपी आणि आरपीएफला देण्यात आली. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित जाहिरात कंपनीला संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितलं. तसेच हे प्रसारण तातडीने बंद करावे असंही सांगितलं. या प्रकाराबद्दल अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरुन कळवण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच या परिमंडळाचे प्रबंधक प्रभाक कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित जाहिरात एजन्सी दत्त कम्युनिकेशन विरोधात आरपीएफकडे एफआयआर दाखल केली. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जावी अशी मागणी प्रबंधकांनी केली आहे. आता या कंपनीकडून दंडही आकारण्यात येणार असून कंपनीला रेल्वेने काळ्या सूचित टाकलं आहे म्हणजेच ब्लॅक लिस्ट केलं आहे.

हे प्रकार सहन केले जाणार नाहीत

असे प्रकार सहन केले जाणार नाही असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणासाठी कारणीभूत असलेल्या जाहिरात एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या जाहिरात एजन्सीच्या मालकाला लवकरात लवकर पोलीस स्थानकात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रकरणामध्ये जाहिरात एजन्सीकडून मोठा दंड वसूल केला जाईल असं सांगण्यात आलं आहे.