मुंबई : नव्या वर्षात पेट्रोल डिझेलच्या किंमती नागरीकांना दिलासा देत आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच पेट्रोल डिझेलच्या किंमती समाधानकार पाहायला मिळाल्या. 1 जानेवारीला पेट्रोलची किंमत 19 पैशांनी कमी झाली होती. आज पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी कपात झाली आहे. 2 आणि 3 जानेवारीला पेट्रोलच्या दरात कोणते बदल झाले नव्हते. वर्षाची सुरूवात पेट्रोल दर कपातीने झाल्याने या बाबतीत तरी हे वर्ष चांगले जाईल अशी आशा व्यक्त होत आहे. जागतिक बाजारात रुपया मजबूत आणि कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने कंपन्यांनी किंमतीत थोडी थोडी कपात केली आहे. जाणकारांच्या मते, येणाऱ्या दिवसांत पेट्रोल 65 रुपये प्रति लीटर पर्यंत पोहोचू शकते. मुंबईत सध्या पेट्रोल 74.10 रु. प्रति लीटर तर डिझेल 65.34 रु. प्रति लीटर किंमतीत मिळत आहे.
पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळेल असे संकेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील दिले आहेत. सरकारतर्फे रिफायनरीची क्षमता वाढवण्यात येत असल्याने याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. दुसरीकडे पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमतीतही मोठी कपात पाहायला मिळत आहे. पेट्रोलियम प्रोडक्ट स्वस्त झाल्याने महागाईवरही याचा परिणाम होणार आहे.
भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीवर ठरतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यावर ठरते. कच्च्या तेलाची मागणी कमी आहे आणि उत्पादन जास्त असल्याने किंमत कमी आहे. पुढचे काही दिवस कच्चा तेलाच्या किंमतीत अशीच घसरण पाहायला मिळेल. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 ते 3 रुपयांनी कमी होतील.