नवी दिल्ली - गेल्या पाच-सहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीला बुधवारी हलका लगाम लागला. बुधवारी पेट्रोलची किंमत घटल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप किंचित कमी झाल्यामुळे पेट्रोलचे दर घसरल्याचे दिसून आले. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८ पैशांनी कमी झाला. पण डिझेलच्या किंमतीमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले नाही. डिझेलचे दर बुधवारी १२ पैशांनी वाढल्याचेच पाहायला मिळाले.
काही दिवसांपूर्वीच पेट्रोलचे दर गेल्यावर्षातील नीचांकी पातळीवर जाऊन पोहोचले होते. पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज वाढू लागले आहेत. बुधवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८ पैशांनी कमी झाल्यानंतर मुंबईमध्ये दर पेट्रोल ७५.९७ रुपयांवर आले. त्याचवेळी डिझेलचे दर १२ पैशांनी वाढल्यामुळे मुंबईमध्ये ते प्रतिलिटर ६७.६२ रुपयांवर जाऊन पोहोचले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुढील काळातही वाढतच राहणार आहेत. त्यामुळे भारतातही येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली. गेल्या वर्षी २७ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतच जात असल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या कच्चे तेल प्रतिपिंप ६० डॉलर एवढ्या किंमतीला विकले जात आहे. जर हिच स्थिती कायम राहिली तर पेट्रोलचे दर प्रतिलिटर २ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.