चेन्नई : कबुतराने बसमधून विनातिकीट प्रवास केल्याने, कंडक्टरला दंड करण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडली,राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने याबाबतीत कंडक्टरला मेमो दिला आहे.
इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बसमधून एक प्रवासी आपल्या कबुतरासोबत गुरुवारी रात्री, हारूर ते इल्लावाडी असा प्रवास करत होता. तब्बल ८० प्रवासी असलेली ही बस हारूरमध्ये दाखल होताच तिकीट तपासनीस बसमध्ये चढला.
प्रवाशांची तिकीट तपासणी सुरू असताना एका प्रवाशाकडे कबुतर असल्याचं या तपासनीसाच्या लक्षात आलं. तेव्हा या कबुतराचं तिकीट काढलंय का? अशी विचारणा त्याने संबंधित प्रवाशाला केली. प्रवाशाने तपासनीसाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
या विनातिकीट कबुतराविषयी तपासनीसाने कंडक्टरला जाब विचारला. त्यावर कंडक्टर म्हणाला की, हा प्रवाशी बसमध्ये चढला त्यावेळी त्याच्याकडे कबुतर नव्हते. कंडक्टरच्या या उत्तराने तपासनीस समाधानी झाला नाही. त्यामुळे त्याला मेमो देण्यात आला.
यावेळी तिकीट तपासनीसाने एका नियमाचा हवाला देऊन सांगितलं की, बसमध्ये प्राणी आणि पक्षांसाठीही तिकीट अनिवार्य आहे. पण हा नियम एखादा प्रवासी 30 पेक्षा जास्त प्राणी अथवा पक्षांना घेऊन प्रवास करत असल्याचं लागू होतो. एका कबुतरासाठी हा नियम लागू होत नसल्याचं, महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे, मात्र त्या आधीच कंडक्टरला दंड ठोठावण्याचा पराक्रम अधिकाऱ्याने केला आहे.