मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यकाळात देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा २७ आणि २८ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. 

Updated: Jan 23, 2019, 04:49 PM IST
मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव title=

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यकाळात देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा २७ आणि २८ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. संस्कृती मंत्रालयाकडून राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात मोदींना मिळालेल्या वस्तूंचा लिलाव होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून लिलावाला सुरूवात होणार असून, यातून मिळणारी रक्कम 'नमो गंगे' प्रकल्पासाठी खर्च केली जाणार आहे. मोदींना मिळालेल्या जवळपास १९०० वस्तूंचा लिलाव होणार आहे.

लिलावातून मिळालेली रक्कम पंतप्रधानांकडून गंगा सफाई अभियानासाठी भेट दिली जाणार आहे. लिलावामध्ये विविध देशातून मिळालेली चित्र, मूर्ती, शॉल, पगडी, जॅकेट तसेच विविध पारंपरिक वाद्ये प्रदर्शित केली जाणार आहेत. या वस्तूंमधून उरलेल्या वस्तूंचा २९ आणि ३० जानेवारी रोजी ई-लिलाव होणार आहे. www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर वस्तूंचा लिलाव होणार आहे. संस्कृती मंत्रालय आणि नॅशनल गॅलेरी ऑफ मॉर्डन आर्ट यांच्याकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. 

पंतप्रधानांना त्यांच्या विदेश यात्रेदरम्यान १२.५७ लाख रूपयांच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंमध्ये फाउंटन पेन, टी सेट, चिनी मातीची भांडी, लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा, फोटो, पुस्तके, घड्याळ अशा विविध वस्तूंचा समावेश आहे.