अविश्वास ठराव जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींना केलं सन्मानित

अमित शाहांनी पंतप्रधान मोदींना लाडू खाऊ घातला

Updated: Jul 31, 2018, 12:33 PM IST
अविश्वास ठराव जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींना केलं सन्मानित title=

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्‍वास ठरावात सरकारचा विजय झाल्याने मंगळवारी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. या बैठकीत विरोधी पक्षाचा पराभव आणि सरकारचा विजय याचं श्रेय पंतप्रधान मोदींना देण्यात आलं.

बैठकीत सुरुवातीलाच पंतप्रधानांना हार घालून सन्मानित करण्यात आलं. पक्षाचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी, पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आणि अनंत कुमार यांनी देखील पंतप्रधान मोदींना सन्मानित केलं. यावेळी अध्‍यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींना लाडू देखील खाऊ घातला. पक्षाच्या नेत्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं.

पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदा संसदीय मंडळाची बैठक झाली. संसद भवनाच्या लायब्रेरीमध्ये झालेल्या या बैठकीत अधिवेशनात येणाऱ्या विविध मुद्दयांवर चर्चा झाली. ट्रिपल तलाक, ओबीसी बिल सारख्या मुद्यांवर ही चर्चा झाली. सरकार याच अधिवेशनात हे बिल सादर करणार आहे. हे दोन्ही बिल राज्यसभेत मंजुर होण्यापासून रखडले आहेत.