दिल्लीच्या 'हुनर हाट'ला मोदींची भेट; कुल्हड चहा, लिट्टी-चोखाचा घेतला आस्वाद

यावेळी पंतप्रधानांकडून नेहमीचा प्रोटोकॉल बाजूला ठेवण्यात आला.

Updated: Feb 19, 2020, 07:04 PM IST
दिल्लीच्या 'हुनर हाट'ला मोदींची भेट; कुल्हड चहा, लिट्टी-चोखाचा घेतला आस्वाद title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीत भरलेल्या 'हुनर हाट'ला भेट दिली. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मोदींनी अचानकपणे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि अन्य काही जणांना घेऊन इंडिया गेट गाठले. याठिकाणी भरलेल्या 'हुनर हाट'मध्ये मोदींनी तब्बल तासभर फिरत होते. यावेळी त्यांनी 'हुनर हाट'मध्ये आलेल्या कलाकार आणि अल्पसंख्याक जमातींशी संवाद साधला. तसेच कुल्हड चहा आणि लिट्टी चोखा या व्यंजनांचा आस्वादही घेतला. 

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी अचानकपणे 'हुनर हाट'ला जायचे ठरवले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मंत्रिमंडळाची बैठक आटोपून नुकतेच आपल्या घरी परतले. त्यावेळी 'हुनर हाट'मध्ये उपस्थित असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला. याठिकाणी एसपीजीचे काही सुरक्षा अधिकारी दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी भेट देऊ शकतात, असे नक्वी यांना सांगण्यात आले. 

विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधानांकडून नेहमीचा प्रोटोकॉल बाजूला ठेवण्यात आला. पंतप्रधान मोदी येतील या आशेने मुख्तार अब्बास नक्वी यांनी धावतपळत 'हुनर हाट' गाठले. मात्र, त्यावेळी वाहतूक सामान्य पद्धतीने सुरु असल्यामुळे मोदी आता याठिकाणी येणार नाहीत, असे मला वाटले. मात्र, थोड्याचवेळात पंतप्रधानांची गाडी राजपथ येथील सिग्नलवर थांबल्याची माहिती आली. त्यावेळी मला आश्चर्याचा धक्काच बसला, असे नक्वी यांनी सांगितले. 

सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी अचानक 'हुनर हाट'ला भेट द्यायचे ठरवले. मात्र, आपल्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये, असे मोदींना वाटत होते. त्यामुळे वाहतुकीवर नेहमीप्रमाणे निर्बंध घालण्यात आले नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर मोदी दुपारी साधारण दीडच्या सुमारास याठिकाणी पोहोचले. त्यांनी 'हुनर हाट'मध्ये तब्बल तासभर घालवला. त्यांनी या जत्रेत फेरफटका मारताना कपड्यांची दुकाने पाहिली. यानंतर काही कलाकारांशी संवादही साधला. 

तसेच मोदींनी कुल्हड चायचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी स्वत:च्या पाकिटातून २० रूपये काढून चहावाल्याला दिले. यानंतर त्यांनी लिट्टी-चोखा मागवला. तेथीलच एका खाटेवर बसून मोदींनी लिट्टी-चोखाचा आस्वाद लुटला. मोदींनी 'हुनर हाट'मधील ही सर्व छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. 'हुनर हाट'मध्ये आजची दुपार अत्यंत चांगली गेली. भारतीय संस्कृती रंग आणि विविधता अनुभवण्यासाठी लोकांनी 'हुनर हाट'ला भेट द्यावी, असे आवाहनही मोदींनी ट्विटरवरून केले.