कोरोना : पंतप्रधान मोदींची माजी राष्ट्रपतींसह 'या' विरोधकांशी चर्चा

पंतप्रधानांचा माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान आणि विरोधकांशी संवाद

Updated: Apr 5, 2020, 03:53 PM IST
कोरोना : पंतप्रधान मोदींची माजी राष्ट्रपतींसह 'या' विरोधकांशी चर्चा title=

नवी दिल्ली : कोरोना विरोधात देशाचे युद्ध सुरुच आहे. केंद्र आणि राज्य सरकारे मिळून हा लढा देत आहेत. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता. सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या ते थेट संपर्कात आहेत. आज त्यांनी माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांशी फोनवरुन चर्चा केली. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी फोनवर संवाद साधला. सोनिया गांधी, मुलायम सिंह, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, केसीआर, स्टॅलिन, प्रकाश सिंह बादल या विरोधकांसोबत कोरोनाबद्दल चर्चा केली.

८ एप्रिलला सकाळी ११ वाजता ते दोन्ही सभागृहातील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत ५ हून अधिक सदस्य असलेल्या पार्टीच्या नेत्यांशी त्यांचा हा संवाद असणार आहे. 

राष्ट्रव्यापी लॉकडाऊन सहित कोरोना वायरसच्या संकटावर ही चर्चा असणार आहे. लॉकडाऊन नंतर पंतप्रधान मोदी यांचा विरोधी पक्षातील नेत्यांशी हा पहिला संवाद असणार आहे. याआधी त्यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.

ट्रम्प यांच्याशी चर्चा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी, राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी विस्तृत चर्चा झाली असून दोन्ही देशांनी मिळून एकत्र कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. भारत आणि अमेरिका मिळून आपल्या संपूर्ण ताकदीने कोरोनाविरोधात लढा देण्याबाबत एकमत झालं असल्याचं, पंतप्रधांनानी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

नेतन्याहू यांच्याशी संवाद 

पंतप्रधान मोदींनी इस्त्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्याशीदेखील कोरोनाबाबत चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी कोरोना व्हायरसविरोधात विविध उपाययोजनांवर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांनी औषधांचा पुरवठा सुधारण्यासाठी आणि उच्च तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर या संदर्भात द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली.