नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या देदिप्यमान यशानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा या दोघांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे ट्विटरवरून शेअर करताना मोदींनी म्हटले की, अडवाणी यांच्यासारख्या महान नेत्यांनी अनेक दशके केलेल्या मेहनतीमुळे आणि लोकांसमोर नवी विचारधारा मांडल्याने भाजपला आज हे यश मिळवणे शक्य झाले आहे.
तर आणखी एका ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी मुरली मनोहर जोशी यांच्याविषयीही आदरपूर्वक उद्गार काढले. त्यांनी म्हटले की, मुरली मनोहर जोशी हे हुशार आणि अत्यंत बुद्धिमान नेते आहेत. त्यांनी शिक्षणक्षेत्रातील सुधारणांसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी कायमच भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले. तसेच माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांसाठी ते कायमच मार्गदर्शक राहिले आहेत. आज सकाळी त्यांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
PM Modi: Dr. Murli Manohar Joshi is a scholar and intellectual par excellence. His contribution towards improving Indian education is remarkable. He has always worked to strengthen the BJP and mentor several Karyakartas, including me. Met him this morning & sought his blessings. pic.twitter.com/3KF7nqNaaN
— ANI (@ANI) May 24, 2019
१७ व्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) पुन्हा एकदा देदिप्यमान कामगिरी करत विरोधकांसह सर्वांनाच आश्चर्याने तोंडात बोटे घालायला भाग पाडले. तर दुसरीकडे मोदी त्सुनामीपुढे काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि अन्य विरोधक भुईसपाट झाले. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी एनडीएला ३५१ तर यूपीएला ९१ जागा मिळाल्या. यामध्ये भाजप व काँग्रेसला अनुक्रमे ३०३ आणि ५२ जागा मिळाल्या.
नरेंद्र मोदी हे पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा बहुमताने सत्तेत येणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन नेत्यांनाच अशी कामगिरी जमली होती.