नवी दिल्ली : काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं खोटं लॉलीपॉप दाखवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. गाजीपूर इथल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकामधील काँग्रेसच्या कर्जमाफी योजनेवर टीका केली. मतांसाठी काँग्रेसने खोटी आश्वासने दिल्याचा आरोपही मोदींनी केलाय. कर्नाटकामध्ये लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन केवळ आठशेच शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यात आल्याचा दावा मोदींनी केलाय. मिशन पुर्वांचल अंतर्गत गाझीपूरमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा सुहेलदेवांचे पोस्ट तिकिट लावल्याप्रकरणीही टीका केली. देशाचे भविष्य सुधारण्यासाठी तुमचा चौकीदार दिवस-रात्र एक करत आहे. तुम्ही आशीर्वाद द्या कारण चौकीदारामुळे चोरांची झोप उडाली आहे. या चोरांना त्यांच्या जागेवर पाठविण्यात येईल असा दिवस नक्की येईल असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान वाराणसी दौऱ्यावर आहेत. गाजीपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमीपूजन मोदींनी केलंय. तसंच महाराज सुहेल यांच्या टपाल तिकीटाचंही मोदींनी अनावरण केलं. वाराणसी दौऱ्यात मोदी तीनशे कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत.