पाकशी चर्चा करण्यासाठी मोदींचा पुढाकार, इम्रान खान यांना पाठवले पत्र

भारत-पाक प्रश्न साहसवादाने सुटणार नाही.

Updated: Aug 20, 2018, 12:32 PM IST
पाकशी चर्चा करण्यासाठी मोदींचा पुढाकार, इम्रान खान यांना पाठवले पत्र  title=

नवी दिल्ली: भारत आणि पाक यांच्यातील संवाद पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवल्याचा दावा पाककडून करण्यात आला. 'जिओ' वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री एसएम कुरेशी यांनी हा दावा केला. 
 
 पंतप्रधान मोदी यांनी इम्रान खान यांना पत्र पाठवले आहे. भारत-पाक यांच्यातील खंडित झालेली चर्चा पुन्हा सुरु होण्याचे हे लक्षण आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी वास्तवाचे भान बाळगूनच पुढे जायला हवे. शेवटी हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये काही प्रश्न प्रलंबित आहेत. याची जाण सगळ्यांना असून आपल्याकडे चर्चेशिवाय पर्याय नाही. याबाबतीत साहसवाद अंगीकारून चालणार नाही, असे कुरेशी यांनी म्हटले. 
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्या सोडवणे अवघड आहे. परंतु आपल्याला चर्चा सुरुच ठेवावी लागेल. काश्मीर हा वादाचा मुद्दा आहे, हे सत्य दोन्ही देशांनी स्वीकारले पाहिजे, असे एसएम कुरेशी यांनी सांगितले. 

दरम्यान, भारताकडून पाकिस्तानी पंतप्रधानांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. काँग्रेस आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला हजेरी लावल्याने त्यांच्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी खरोखरच पाकशी चर्चेसाठी पुढाकार घेतला तर भाजपचे नेते काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.